बीजिंग : चीनच्या वायव्येकडील गांसू प्रांतातील युमेन शहरातल्या एका व्यक्तीचा प्लेगमुळे मृत्यू झाल्याने खबरदारी म्हणून उर्वरित देशासोबत या शहराचा संपर्क तोडण्यात आला असून येथील नागरिकांना बाहेर जाण्यास व बाहेरील नागरिकांना शहरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. प्लेगची लागण झाल्याचा संशय असलेल्या १५१ जणांना येथील एका रुग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्लेगमुळे चीनमध्ये एका शहरावर ‘बहिष्कार’
याविषयी स्थानिक माध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार युमेन शहरातील एका व्यक्तीचा मागील बुधवारी संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाला होता. मृत्युपश्चात केलेल्या तपासणीत त्याला प्लेगची लागण झाली होती, असे स्पष्ट झाल्याने येथे खळबळ माजली असून खबरदारी म्हणून या शहराचा उर्वरित चीनसोबतचा संपर्क तोडण्यात आला आहे. देशात प्लेगचा उद्रेक होऊ नये यासाठी चीन सरकारकडून सर्व ती खबरदारी घेतली जात असून संबंधित मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १५१ जणांना येथील एका रुग्णालयात डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांकडून समजते. जवळपास ३0 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात पुढील महिनाभर पुरेल एवढा अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा साठा असल्याचे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. हे संपूर्ण शहरच सील करण्यात आले असून येथील नागरिकांना बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच प्रांतातील इतर शहरांतल्या नागरिकांनी या युमेनमधून जाणार्या मार्गाचा वाहतुकीसाठी वापर करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्लेग हा एक संसर्गजन्य आजार आहे.