रियाध : सौदी अरेबियातील पोलिसांनी एका भिकाऱ्याला अटक केली आहे. अटकेनंतर हा भिकारी करोडपती असल्याचे समोर आले आहे.
याबाबत सौदी गॅझेटने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी पश्चिम सौदी अरबमधील ‘यान्बू’मधून मूळ अरब असलेल्या या व्यक्तीला अटक केल्यानंतर त्याच्याकडे 1.92 करोड रुपये आणि काही किंमती वस्तू जप्त केल्या आहेत.
करोडपती भिकाऱ्याला सौदी अरेबियात अटक
मदीना पोलिसांचा प्रवक्त फहद अल-गानम यांच्या म्हणण्यानुसार, संदिग्ध अवस्थेत भीक मागताना आढळलेल्या या व्यक्तीला अटक केली गेली. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे सौदी अरेबियात भीक मागण्यावर बंदी आहे.
संशयास्पद अवस्थेत आढळलेला हा भिकारी एका लग्झरी अपार्टमेंटमध्ये राहत होता आणि दुसऱ्या शहरांमध्ये जाण्यासाठी स्वत:च्या गाड्यांचाही तो वापर करत होता. चौकशी केल्यानंतर त्याला भीक मागण्यासाठी त्याची पत्नी आणि तीन मुलेही मदत करत असल्याचे समोर आले. या कुटुंबातील सर्वच सदस्य सौदी अरेबियात अवैधरित्या राहत होते.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आखाती देशांतून ‘इन्व्हेस्टमेंट लायसन्स’ या भिकाऱ्याने मिळवले होते. याच दरम्यान, पोलिसांनी त्याच्या सगळ्या हालचालींची चौकशी केली असता, तो सौदी अरेबियाचा नागरिक नसल्याचेही समोर आले.