1 ऑगस्टला होणार अँडरसन-जडेजा वादाप्रकरणी सुनावणी

anderson
लंडन – दि. 1 ऑगस्ट रोजी जेम्स अँडरसन व रवींद्र जडेजा यांच्यातील वादाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या आयोगाने याप्रकरणी सुनावणी होईल, अशी घोषणा केली. सुनावणी झाल्यानंतर आयसीसी शिस्तपालन कलम 5.2.12 नुसार 48 तासांतच ते आपला निर्णय जाहीर करतील, असे स्पष्ट संकेत आहेत. एका पत्रकाद्वारे आयसीसीने ही माहिती दिली असून चौकशीसाठी सर्व अधिकार गॉर्डन लुईस यांना यापूर्वीच बहाल करण्यात आले आहेत.

जेम्स अँडरसनची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे होणार असून त्यानंतर ईसीबीचे पदाधिकारी, त्यांचे कायदेतज्ञ, बीसीसीआयचे पदाधिकारी व अन्य तज्ञ यांच्याशी आयोग चर्चा करणार आहे. सामनाधिकारी डेव्हिड बून हे रवींद्र जडेजाची बाजू ऐकून घेतील. सध्या अँडरसनला दि. 27 जुलैपासून खेळवल्या जाणाऱया तिसऱया कसोटी सामन्यासाठी हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे. पण, चौकशीत तो दोषी आढळून आला तर त्याला चौथ्या व पाचव्या कसोटी सामन्याला मुकावे लागणार आहे, हे निश्चित आहे. चौथी कसोटी दि. 7 ऑगस्टपासून खेळवली जाणार आहे.

आयसीसी शिस्तपालन समितीच्या विविध कलमांनुसार अँडरसन दोषी आढळल्यास त्याच्यावर दोन कसोटी किंवा 8 वनडे सामन्यांची बंदी लादली जाऊ शकते. दोषी खेळाडू पुढे कसोटी खेळणार आहे की वनडे, यावर त्याचे निलंबन लागू होते. अँडरसन दोषी आढळल्यास पुढे आणखी दोन कसोटी सामने होणार असल्याने तो या सामन्यातून बाहेर फेकला जाऊ शकतो.

Leave a Comment