भारताच्या शीख खेळाडूंची चीनमध्ये उतरवली पगडी

basketball
नवी दिल्ली – भारतीय संघाने चीनमध्ये पार पडलेल्या बास्केटबॉलच्या आशिया कपमध्ये चमकदार कामगिरी केली असली तरी चीनमध्ये संघातील शीख खेळाडूंना मात्र कटू अनूभवाला सामोरे जावे लागले. सामन्या दरम्यान पगडी घालून खेळण्यास भारतीय संघातील दोन शीख खेळाडूंना मज्जाव करण्यात आल्याने या खेळाडूंना पगडीविनाच मैदानात उतरावे लागले होते. यामुळे शीख खेळाडूंनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी भारतीय बास्केटबॉल संघ चीनमध्ये आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल फेडरेशनच्या आशिया कप स्पर्धेसाठी गेला होता. यास्पर्धेत चीनवर भारताने मात केलीच. त्याशिवाय इराण, जॉर्डन,आणि फिलीपाईन्स या देशांनाही काटे की टक्कर दिली होती. या दौ-यात भारताच्या कामगिरीने खेळाडूंच्या आत्मविश्वासात भर पडली असली तरी मात्र कटू आठवणी घेऊन संघातील दोन शीख खेळाडू दौ-यावरुन परतले आहेत. सामन्यापूर्वी अमृतपाल सिंग आणि अमरज्योत सिंग या दोघा शीख खेळाडूंना पगडी उतरवायला भाग पाडण्यात आले. बास्केटबॉलमधील नियमांनुसार सामन्यादरम्यान कोणताही खेळाडू अन्य कोणाला दुखापत होईल अशा गोष्टी घालून मैदानात उतरु शकणार नाही. याच नियमाचा दाखला देत दोघांनाही पगडी उतरवायला सांगण्यात आले. अखेरीस हे दोघेही विना पगडीच सामन्यात खेळत होते. सामन्याच्या काही क्षणांपूर्वी ऐवढा मोठा अपमान सहन करुनही अमृतपाल सिंगने सामन्यात १५ पॉईंट स्कोअर केले.

Leave a Comment