नवकोट नारायणांच्या विवाह समारंभाचे व्यवस्थापन

groom
आपण लग्नाची कामे करणार्‍या कंत्राटाच्या व्यवसायाची माहिती घेतली, मात्र त्यामध्ये फार खोलात शिरलो नाही. कारण लग्न हा समारंभ आपल्याला नित्याचाच असतो. तसे असले तरी आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांच्या कल्पनेत सुद्धा बसणार नाही अशा थाटात काही करोडपती लोकांचे विवाह समारंभ होत असतात. त्या समारंभाच्या इव्हेंट मॅनेजमेंटचे काम फार कौशल्याने आणि व्यावसायिक पद्धतीने करावे लागते. तिथे अतीशय कल्पकतेने आणि बारकाईने उत्तम व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून जे तरुण आपली चुणूक दाखवतील त्यांना लाखो रुपयांची कमाई होऊ शकते. अशा लग्न समारंभात दोन्हीकडची वर्‍हाडी मंडळी आपली गावे सोडून तिसर्‍याच एखाद्या बेटावर किंवा एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी विवाह समारंभ पार पाडत असतात. अशा कार्यस्थळावर दोन्हीकडच्या वर्‍हाडींना विमानाने नेण्याची व्यवस्था करावी लागते आणि या समारंभाच्या इव्हेंट मॅनेजमेंटची सुरुवात सर्वांच्या विमानाची तिकीटे बुक करण्यापासून होत असते, मग लग्नाचा थाट तर वेगळाच. जेवणाची व्यवस्था करताना किती तरी पथ्ये पाळावी लागतात. बराच काथ्याकूट करून जेवणातले पदार्थ ठरवले जातात.

निरनिराळ्या प्रांतातील खाद्यपदार्थ देता यावेत आणि पाहुण्यांनी वाहवा करावी यासाठी त्या विशिष्ट खाद्य पदार्थांचे तज्ज्ञ शेफ कोठून आणता येतील याचा विचार करावा लागतो आणि ते अन्य प्रांतातील असले तरी तिथून त्यांना आणावे लागते. आपण मध्यमवर्गीय लोक प्रिंटिंग प्रेसमध्ये जातो आणि तिथल्या अल्बमधून एक पत्रिका निवडून ती छापण्याची ऑर्डर देतो. परंतु श्रीमंतांच्या लग्नाचा थाट वेगळाच असतो. त्यासाठी देशभरात ख्यातनाम असलेल्या कलाकारांना बोलवून त्यांच्याकडून पत्रिकांचे वेगवेगळे डिझाईन तयार केले जातात. हे डिझाईन्स् चक्रावून टाकणारे असतात. लाकडात कोरीव काम करण्यापासून ते इलेक्ट्रानिक्स्ची कसली तरी करामत करण्यापर्यंत युक्त्या त्यात केलेल्या असतात. अशा लग्नाची इव्हेंट मॅनेजमेंट करणार्‍यांना ठायीठायी अशा गोष्टी करताना कल्पकतेचे दर्शन घडवावे लागते. एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने एका धनाढ्य कुटुंबातील लग्नाची पत्रिका अशी काही वेगळी केली होती की, ती पत्रिका पहिल्यांदा जो उघडेल त्याला सनईचे सूर ऐकू येत होते, तशी व्यवस्था त्या पत्रिकेत केली होती. या पत्रिकेच्या वितरणाचाही एक कार्यक्रम आखलेला असतो. ती पत्रिका देण्याची पद्धत सुद्धा अगदी वेगळी असते. तिच्यासोबत मिठाई किंवा सुकामेवा दिला जात असतो. हे टाईमटेबल इव्हेंट मॅनेजमेंट करणार्‍या व्यवस्थेला आखावे लागते.

काही विवाहांमध्ये सहभागी होणार्‍या वर्‍हाडींना विवाह समारंभाचे वेळापत्रक तपशीलात दिले जाते. ते तयार करताना प्रत्येक कार्यक्रमाचा आणि विधीचा वेळ, त्याचे ठिकाण आणि उपस्थितांनी त्यावेळी कसले कपडे घालावेत याच्या सूचना दिलेल्या असतात. त्या पोचल्या असल्याची खात्री करून घ्यावी लागते आणि ते सारे वर्‍हाडी तो ड्रेसकोड पाळतील यावर लक्ष ठेवावे लागते. प्रत्यक्ष जेवणाची व्यवस्था अतीशय काटेकोरपणे दर्जेदार रितीने करावी लागते. तिला अशा विवाहांमध्ये अतोनात महत्व असते. इथे इव्हेंट मॅनेजमेंटची खरी कसोटी लागते. अशा विवाहांमध्ये सहभागी होणारे लोक, वर्‍हाडी, वधू-वर पक्ष हे सारे कोट्याधीश असल्यामुळे त्यांचे आहेर, भेटवस्तू यांचाही थाट तसाच असतो. त्यांना परतीचे आहेर देण्याची व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंटच्या संस्थेला करावी लागते. मग ते आहेर ठरवताना ती व्यक्ती कोण आहे, तिचा सामाजिक स्तर काय आहे या सगळ्यांचे भान ठेवावे लागते.

अशा लग्नाच्या समारंभात एखाद्या सेलिब्रिटीची उपस्थिती हा प्रतिष्ठेचा विषय ठरत असतो. ती व्यक्ती त्या कुटुंबाच्या प्रत्यक्षात संबंधात नसली तरी समाजात प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे तिला पाचारण केले जाते आणि लग्न समारंभाची शोभा वाढवली जाते. अशा उपस्थितीसाठी भरभक्कम मानधन दिले जाते, त्याची ठरवाठरवी इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेला करावी लागते. सार्‍या गोष्टी सर्वांच्या प्रतिष्ठेला शोभतील अशाच व्हाव्यात यावर कटाक्ष ठेवावा लागतो. शिवाय वरात हा एक मोठाच कौशल्याने हाताळायचा विषय असतो. अनेक चित्रपटांमधून लग्नाच्या विविध प्रांतातल्या विधी आणि सोपस्कारांची माहिती जनतेच्या समोर यायला लागले आहेत आणि तो सोपस्कार, तो विधी आपल्या प्रांतातला नसला तरी त्याचे अनुकरण आणि नक्कल करण्याची प्रवृत्ती विवाह समारंभ करणार्‍यांमध्ये वाढत चालली आहे. अशी एखादी हौस भागविण्यासाठी करावयाच्या सगळ्या व्यवस्था इव्हेंट मॅनेजमेंट संस्थेला कराव्या लागतात. हे मोठे अवघड काम आहे ही गोष्ट खरी, परंतु आपण सूक्ष्म अवलोकनाद्वारे यातले बारीक-सारीक तपशील आत्मसात करू शकतो आणि कल्पनेच्या जोरावर उत्तम व्यवस्थापन करू शकतो. शेवटी सूक्ष्म अवलोकन आणि योग्य नियोजन हा व्यवस्थापनाचा आत्मा असतो. या गोष्टींना भांडवल लागत नाही. काही कोटी रुपये खर्च करून होणार्‍या विवाहाचे व्यवस्थापन करणार्‍या इव्हेंट मॅनेजरला २५-३० लाखांची कमाई सहज होऊन जाते.

Leave a Comment