खेतान यांचे ‘स्टींग’बनावट; पोळ यांच्या वकीलांचा दावा

khetan
पुणे – डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणी ‘प्लँचेट’ केल्याची कबुली तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी दिल्याचा दावा करणारा ‘व्हिडिओ’ बनावट असल्याचा दावा पोळ यांचे कोल्हापूर येथील वकिलांनी केला आहे, तर या व्हिडिओमध्ये पोळ यांनी कोणतीही कबुली दिल्याचे दिसून येत नाही. असे पोळ यांचे पुण्यातील वकील हर्षद निंबाळकर यांनी स्पष्ट केले आहे.

अंध:श्रद्धा निर्मूलन चळवळीचे प्रणेते डॉ. दाभोळकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी प्लँचेटचा आधार घेतल्याचे वृत्त ‘आऊटलूक’ ने प्रसिद्ध केल्यावर पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन या गोष्टीचा इन्कार केला, तसेच या वृत्तासाठी आऊटलूक आणि पत्रकार आशिष खेतान यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचेही सांगितले.

या पत्रकार परिषदेनंतर खेतान यांनी प्लँचेट करीत असल्याचा तसेच प्लँचेटची कथित कबुली पोळ यांनी दिल्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला. हा व्हिडिओ प्रसिद्ध होताच राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणी कसून चौकशी करण्या मागणी डॉ. दाभोळकर यांच्या कुटुंबियांनी केली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तर पोळ यांच्यासह प्ँलचेट करणारे निवृत्त पोलीस कर्मचारी मनिष ठाकूर आणि पोळ आणि ठाकूर यांची भेट करून देणारे मा. सहाय्यक पोलीस आयुक्त रणजित अभिनकर यांच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी ही केली आहे.

मात्र खेतान यांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ बनावट असल्याचा दावा अ‍ॅड.मोरे यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्याचप्रमाणे आऊटलूक व खेतान यांच्यावरील शंभर कोटीचा दावा कायम ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. अँड. निंबाळकर यांनी या व्हिडिओत पोळ यांनी कोणतीही कबुली दिली नसल्याचा दावा केला. पोळ यांनी केवळ डॉ. दाभोळकर हत्या प्रकरणी तपासाला मदत करण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याचे आणि या तपासासाठी वाहतूकीच्या साधनांसह ‘सिक्रेट मंड’ मंधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या बैठकीत उपस्थित असणाऱ्या कोणी जर तांत्रिक मार्गाचा अवलंब केला असेल तर त्याच्याशी पोळ यांचा संबंध नाही, असा दावाही अ‍ॅड. निंबाळकर यांनी केला.

Leave a Comment