स्मार्टफोन वापरात भारतीय आघाडीवर

mobile
एरिक्सन या टेलिकॉमसाठी साधने बनविणार्‍या कंपनीने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणात जगात स्मार्टफोन वापरण्यात भारतीय आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. या अहवालानुसार भारतीयांत स्मार्टफोन वापराचे प्रमाण दररोज ३ तास १८ मिनिटे इतके आहे तर यूएस मध्ये हेच प्रमाण २ तास १२ मिनिटे इतके आहे. अन्य कांही आशियाई देशात हे प्रमाण ४० ते ५० मिनिटाच्या दरम्यान आहे. या अहवालाचा उपयोग कोणत्या प्रकारची डेटा पॅकेज डिझायनरना अधिक फायद्याची ठरतील हे ठरविण्यासाठी होणार आहे.

या अहवालानुसार भारतीय जो वेळ स्मार्टफोनवर घालवितात त्यातील एक तृतीयांश वेळ हा अॅप्सवर घालविला जातो. गेल्या दोन वर्षात भारतात अॅप्सचा वापर ६३ टक्के वाढला आहे व ७६ टक्के लोकांनी मोबाईल ब्रॉडबँडने अजून सुविधा दिल्या तर जादा पैसे खर्च करण्याची तयारी दर्शविली आहे.

एरिक्सनचे उपाध्यक्ष अजय गुप्ता म्हणाले सर्वेक्षणात असेही आढळले आहे की दिवसातून किमान ७७ वेळा स्मार्टफोन चेक करणार्‍यांचे प्रमाण सर्वाधिक असून १०० पेक्षा जास्त वेळा फोन चेक करणार्‍यांचे प्रमाण २६ टक्के आहे. त्याचप्रमाणे व्हाटस अॅप, वुई चॅट यासारख्या अॅपचा वापर व्यावसायिक कारणांसाठीही केला जात आहे. नोकरदारांमध्ये ऑनलाईन खरेदीसाठी स्मार्टफोनचा वापर अधिक आहे. स्मार्टफोन वर व्हिडीओ प्लेअर्सची संख्याही जास्त असून १२ टक्के गृहिणी घरातील अन्य व्यक्ती टिव्ही पाहात असतील तर स्मार्टफोन वर व्हिडीओ पाहतात. अनेक जण सकाळची सुरवात अध्यात्मिक व्हिडीओ पाहून करतात. भारताच्या १८ शहरांतील ४ हजार युजरनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला.

एरिक्सन भारतात आक्टोबर डिसेंबर या कालावधीत डॉट सोल्युशन्स लाँच करणार आहे.

Leave a Comment