नवी दिल्ली – मित्रपरिवार वाढविण्यास व त्यांच्या नियमित संपर्कात राहण्यास मदत करणारी सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक आपल्या युर्जसना ऑनलाइन खरेदीची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
फेसबुकवर आता खरेदीही !
फेसबुकचे इंजिनियर असे एक फिचर विकसित करण्याच्या विचारात आहेत, ज्याच्या मदतीने युर्जस आपल्या न्यूजफीडमधील जाहिराती वा पोस्टद्वारे थेट खरेदी करू शकतील. फेसबुकच्या माहितीनुसार, या फिचरच्या मदतीने खरेदीसाठी युजरला नेटवर्कच्या बाहेर येण्याची गरज पडणार नाही. सुरुवातीच्या टप्प्यात त्याचा वापर अमेरिकेतील काही व्यावसायिक संस्थामध्ये केला जाईल. या फिचरमध्ये मोजक्याच उत्पादनांच्या खरेदीचा पर्याय दिला जाईल. याआधी फेसबुकने आपल्या साइटवरील खरेदीची सुविधा बंद केली होती. मात्र या दिशेने मिळत असलेले यश पाहून त्यास पुन्हा चालना देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीस फेसबुकने फेसबुक क्रेडिट्स नावाचे आभासी चलन जारी केले होते, त्याद्वारे लोक गेम खरेदी करू शकत असत. एक डॉलर दहा फेसबुक क्रेडिटच्या मूल्याचा होता. अर्थात फेसबुकची ही सुविधा सन २0१२मध्ये मागे घेण्यात आली व त्याजागी फेसबुक गेम कार्ड्स जारी केले होते.