जळत्या सिगारेट अंगावर टाकायचा नेस – प्रिती

preity
मुंबई – बॉलिवुड अभिनेत्री प्रिती झिंटाने नेस वाडियावर विनयभंगाचे आरोप केले आहेत. या प्रकरणी पोलिस आयुक्त राकेश मारिया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये पुन्हा एकदा नेस वाडियावर गंभीर आरोप केले आहेत.

माझ्या अंगावर नेस जळत्या सिगारेटी टाकायचा. मला खोलीमध्ये कोंडून ठेवायचा. माझ्याबरोबर तो अतिशय आक्रमक आणि हिंसकपणे वागायचा. त्याने माझ्या चेह-यावर जळत्या सिगारेटी टाकल्या. मला मारहाण केली. मी हे सर्व सहन केले. त्यामुळे वानखेडे स्टेडियमवरील ३० मे च्या घटनेनंतर मला नेस विरोधात पोलिस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करावी लागली असे प्रितीने राकोश मारिया यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

परदेशात जाण्याची परवानगी मागण्यासाठी प्रितीने ३० जून रोजी राकेश मारिया यांची भेट घेतली. त्यावेळी तिने हे पत्र राकेश मारिया यांना दिले. नेस वाडियाला माझ्यापासून दूर ठेवा तरच मी शांततेने जगू शकेन. अन्यथा एक दिवस रागाच्या भरात नेस मला मारुन टाकेल. त्याच्या या स्वभावाची मला प्रचंड भिती वाटते असे प्रितीने या पत्रात म्हटले आहे.

पोलिसात तक्रार दाखल करुन, वाडिया यांचे नुकसान करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. पण स्वत:च्या सुरक्षेसाठी पोलिसांकडे येण्यावाचून माझ्यासमोर कोणताही दुसरा पर्याय राहिलेला नाही. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नेस मला भविष्यात धोका पोहोचवू शकतो असे प्रितीने आपल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Comment