‘सिंहगड’चा मार्ग तीन दिवस बंद

sinhgad
पुणे – पावसाळयाच्या दिवसात पर्यटकांची सर्वाधिक पसंती असणाऱ्या किल्ले सिंहगडचा मार्ग पुढील तीन दिवसासाठी बंद राहणार आहे. दरड कोसळल्याने चिंब पावसात भिजण्याचा आणि गडावर कांदा भजीवर ताव मारण्याचा बेत पर्यटकांना रद्द करावा लागणार आहे.

सिंहगड घाटात मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी तीन दिवस बंद करण्यात आला आहे.सिंहगड खोऱ्यात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडतोय. या भागात रस्ता रूंदीकरणाचे काम सुरु आहे. पावसामुळे मंगळवारी पहाटे घाट रस्त्यात दरड कोसळली. जेसीबीच्या साह्याने रस्ता पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून सिंहगडावर जाणाऱ्या पर्यटकांना अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरावे लागले. सिंहगड आणि परिसर हा नेहमीच पर्यटकांना खुणावणारा आहे. पडणारा पाऊस … मध्येच धुक्यातून जाणारी वाट त्यात गोठवून टाकणारा गारवा ,हिरवेगार डोंगर अशा नयनरम्य परिसरातून भटकंती करीत गड गाठायचे आणि गडावरून विहंगम दृश्य डोळ्यात साठवायचे. पावसात चिंब भिजून गडावर गरमागरम कांदा भजीवर ,झुणका भाकरीवर ताव मारायचा हा बेत अनेकांचा असतो. विशेषत; तरुणाईची किल्ले सिंहगड ही ट्रीप कोणत्याही सिझनमध्ये आवडीचीच पण पावसाळ्यात सिंहगडाच्या सहलीची मजा अनोखी असते मात्र पुढील तीन दिवस या परिसरात ‘ प्रवेश निषिद्ध ‘ राहणार असल्याने पर्यटकांचा हिरमोड नक्कीच होणार आहे.

Leave a Comment