बंडखोरांनी ‘त्या’ विमानाचा ब्लॅकबॉक्स सोपवला

black-box
किव्ह – युक्रेनच्या बंडखोरांनी बक क्षेपणास्त्राने पाडलेल्या मलेशियन एअरलाइन्स कंपनीच्या एम. एच. १७ या प्रवासी विमानाचा ब्लॅकबॉक्सची तपासणी लवकरच सुरू होणार आहे. रशियाचे समर्थक असलेल्या युक्रेनच्या बंडखोरांनी ब्लॅकबॉक्स तपासणी पथकाला सोपवला आहे.

मलेशियाचे पंतप्रधान नजिब रझाक यांनी सोमवारी सकाळी अलेक्झांडर बोरोडोई याच्याशी फोनवरुन चर्चा केली. या चर्चेअंती बोरोडोईने ब्लॅकबॉक्स तपासणीसाठी देण्याची तयारी दर्शवली. एका स्वतंत्र आंतरराष्ट्रीय तपासणी पथकाद्वारे ब्लॅकबॉक्समधील माहितीचे विश्लेषण केले जाईल. या माहितीवरुन विमान नेमके कोणत्या वेळी आणि कोणत्या कारणामुळे पडले हे स्पष्ट करणारे तांत्रिक पुरावे उपलब्ध होतील. क्षेपणास्त्र हल्ला करण्याआधी वैमानिकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला होता की नव्हता, यावर प्रकाश पडेल. ब्लॅकबॉक्समधील माहितीमुळे एम. एच. १७ दुर्घटनेसंदर्भातल्या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळेल. तपासणी पथक विमान ज्या भागात पडले त्या ठिकाणी जाऊन अवशेषांचीही पाहणी करणार आहे. बंडखोरांचा नेता अलेक्झांडर बोरोडोई याने ब्लॅकबॉक्स तपासणी पथकाला सोपवल्याची माहिती दिली.

Leave a Comment