पोळ यांचे बिंग फुटले

pol
पुणे – पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी छातीठोकपणे सांगितले की डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात प्लॅन्चेटचा आधार घेतलेला नाही, पण आता त्यांचे बिंग एका स्टिंग ऑपरेशनमुळे फुटले आहे. गुलाबराव पोळ यांच्या स्टिंग ऑपरेशनचा व्हिडीओ आशिष खेतान यांनी मंगळवारी जाहीर केला असून या व्हिडीओत पोळ हे दाभोळकरांच्या आत्म्याशी संवाद साधल्याची कबुली देताना दिसत आहेत.

पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करण्यासाठी प्लॅन्चेट केल्याचे वृत्त आशिष खेतान यांनी दिले होते. अंधश्रद्धेविरोधात लढा देणा-या दाभोलकर यांच्या हत्येच्या तपासात तांत्रिकाची मदत घेतल्याने पोळ यांच्यावर सर्व स्तरातून टीका झाली होती. कालच खेतान यांनी केलेला दावा गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषद घेऊन फेटाळून लावला. तसेच १०० कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा करण्याची घोषणाही केली होती.

एका वृत्तवाहिनीवर मंगळवारी खेतान यांनी गुलाबराव पोळ यांचे स्टिंग ऑपरेशन जाहीर करुन पोळ आणि पुणे पोलिसांची नाचक्कीच केली आहे. या व्हिडीओत पोळ हे मनीष ठाकूरच्या मदतीने प्लॅन्चेट करुन दाभोलकरांच्या आत्म्याशी संवाद साधल्याची कबूली देताना दिसतात. तर तांत्रिक व निवृत्त पोलिस कॉन्स्टेबल मनीष ठाकूर हा प्लॅन्चेट करताना व्हिडीओत कैद झाला आहे. मी दाभोलकर बोलतोय असे ठाकूरने म्हटल्याचे या व्हिडीओतून स्पष्टपणे दिसते. पोलिसांनी या प्रकरणाची त्रयस्थपद्धतीने चौकशी करावी. चौकशी समितीने माझ्याकडे पुरावा मागितल्यास मी या घटनेचे संपूर्ण व्हिडीओ फुटेज द्यायला तयार आहे असे खेतान यांनी म्हटले आहे. खेतान यांच्याकडे पाच ते सहा तासांचे व्हिडीओ फुटेज आहे.

Leave a Comment