चांगल्या कामगिरीवर भारतीय वेटलिफ्टर्सची भर

glasgow
ग्लॅस्गो – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत होणाऱया वेटलिफ्टींग प्रकारात पूर्वीच्या तुलनेत यावेळी अधिक दर्जेदार कामगिरी करण्यासाठी भारतीय स्पर्धक प्रयत्न करतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय चमू येथे दाखल झाला. दरम्यान भारतीय संघासाठी निवासाची सोय ग्लॅस्गोच्या शहराच्या पूर्वेला क्रीडा धाममध्ये करण्यात आली. पण तेथील व्यवस्था चांगली नसल्याने भारतीय खेळाडूंना सामाईक स्वच्छतागृहाचा वापर करावा लागला.

या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी गेल्या एक महिन्याच्या कालावधीत भारताच्या के रविकुमार आणि संगीता छानू याना बर्मिंगहॅममध्ये खास प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले होते. दिल्लीतील राष्ट्रकुल स्पर्धेत रविकुमार आणि छानू यानी सुवर्णपदके मिळविली होती. या स्पर्धेकरिता 15 वेटलिफ्टर्सची निवड करण्यात आली. ग्लॅस्गोतील हवामानाशी जुळवून घेणे सोपे जावे यासाठी भारतीय वेटलिफ्टर्सना बर्मिंगहॅममध्ये सरावाकरिता पाठविण्यात आले होते. रविकुमार यापूर्वी 69 किलो वजन गटात सहभागी होत असे. यावेळी तो 77 किलो वजन गटात भाग घेणार आहे. कनिष्ठ पातळीवर मिनाकुमारी आणि माता संतोषी यानी दर्जेदार कामगिरी केल्याने निवड सदस्य संधू यानी त्यांची या स्पर्धेसाठी निवड केली. 56 किलो गटात सुखेन डे आणि दिनेश मल्ली तसेच 84 किलो गटात विकास थापर यांच्याकडून या स्पर्धेत भारताला पदक मिळू शकेल. महिलांच्या विभागात 48 किलो गटात संगीता तसेच 53 आणि 58 किलो गटात अनुक्रमे माता संतोषी व मिनाकुमारी भारताचे प्रतिनिधित्व करतील. या स्पर्धेत भारताला प्रामुख्याने नायजेरियाचे कडवे आव्हान राहील. तसेच ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि वेल्स यांच्या स्पर्धकांना भारतीय चमुला तोंड द्यावे लागेल.

Leave a Comment