काँग्रेस मुक्त महाराष्ट्रासाठी झटा- नरेंद्र मोदी

modi
मुंबई – येथील भाभा अणुसंशोधन केंद्राच्या भेटीवर आलेल्या नरेंद्र मोदी यांनी आपला पूर्वनियोजित कार्यक्रम बदलून सायंकाळी ग्रँट हयात या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्यातील भाजप नेत्यांची भेट घेतली आणि विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेतला, तसेच महत्त्वाची चर्चा केली असल्याचे वृत्त आहे. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष फडणवीस, विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्यासह सुमारे ५० वरीष्ठ नेते हजर होते. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मोदी यांची ही पहिलीच मुंबई भेट होती.

मिळालेल्या माहितीनुसार मोदी सरकारी कार्यक्रमासाठी मुंबईत येणार असल्याचे पक्षातर्फे सांगितले गेले होते. भाभा मधील कार्यक्रम आटोपून मोदी सायंकाळी दिल्लीला रवाना होणार होते. मात्र अचानक मोदींनी कार्यक्रम बदलला आणि सायंकाळी ७ वाजता राज्यातील नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी कायर्ककर्त्यांना काँग्रेस मुक्त महाराष्ट्रासाठी झटून काम करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकांसाठी लोकांसमोर आत्मविश्वासाने जा,एक दिलाने काम करा आणि राज्यात भाजपची सत्ता आणा असाही उपदेश मोदींनी केला.

एका वरीष्ठ नेत्याकडून मिळालेल्या माहितीनुसार मोदी म्हणाले की देशात प्रथमच नॉन काँग्रेस सरकार बहुमताने निवडून आले आहे. देश प्रगती करतो आहे ही भावना देशवासियांतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही निर्माण झाली आहे. तेव्हा विजयाचा आत्मविश्वास असू द्या. राज्यातील निवडणूक तयारीबद्दलही त्यांनी माहिती घेतली आणि केंद्रातील सरकारच्या कामगिरीबद्दल राज्यातील नेत्यांना त्यांची मतेही विचारली. प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीचे वर्णन – ते आले, ते बोलले आणि ते जिंकले – असे केले आहे. या बैठकीला पत्रकारांना प्रवेश दिला गेला नव्हता असेही समजते.

Leave a Comment