गरिबांची गाय : शेळी

goat
महात्मा गांधी शेळीला गरिबांची गाय म्हणत असत. कारण शेळीही गायीप्रमाणेच दूध देते पण गाय महाग असते. गोपालन करायला मोठी गुंतवणूक करावी लागते. जर्सी गायी तर हजारो रुपयांना विकल्या जात आहेत आणि म्हशींचे तर विचारूच नका. त्यामुळे अगदी गरीब शेतकर्‍यांना आणि शेतमजुरांना तेवढाले पैसे गुंतवून गाय किंवा म्हैस खरेदी करणे परवडत नाही. अशा लोकांना करता येणारा सर्वात सोपा आणि कमी भांडवलाचा धंदा म्हणजे शेळी पालन. हा धंदा किरकोळ भांडवलात करता येतो. काही तरुण हा व्यवसाय करण्याची योजना आखतात पण त्यांच्या धंद्याच्या काही विशिष्ट कल्पना असतात. धंदा करणे म्हणजे बॅँकेत जाणे, लोन काढणे आणि दणक्यात उद्घाटन करून धंदा सुरू करणे अशी त्यांची कल्पना असते. ते त्यासाठी र्बँकांकडे चकरा मारायला लागतात पण बँका काही त्यांना लोन देत नाहीत. मग हे तरुण वैतागतात. यामागे कारण काय आहे ? पूर्वीपासून शेळीबाबत काही प्रचार झालेला आहे. शेळी ही झाडांचे आणि पिकांचे शेंडे खाते. त्यामुळे शेळी हा पिकांचा आणि झाडांचा शत्रू आहे असे समजले जात आहे. तो जर शत्रू आहे तर त्यासाठी कर्ज कशाला द्यायचे अशी अनेक बँक अधिकार्‍यांची मन:स्थिती आहे. वास्तविक शेळी पालनाच्या तंत्रात अनेक बदल झाले आहेत.

शेळी हा पिकांचा शत्रू वगैरे काही राहिलेला नाही.शेतीचे नुकसान न करता शेळी पाळता येते. पण, ही गोष्ट बँकांच्या अधिकार्‍यांपर्यंत अजून पोचलेली नाही. त्यामुळे परंपरेने चालत आल्याप्रमाणे शेळीला कर्ज नाकारले जाते. शेळीला कर्ज देण्यातली आणखी एक अडचण म्हणजे शेळ्यांना होणारे आजार. शेळ्यांना काही आजार झाला की त्या पटापट मरायला लागतात असा प्रवाद आहे. ही काही वस्तुस्थिती नाही. ङ्गार कमी वेळा असे प्रकार घडतात.तेही शेळ्यांना योग्य त्या लसी टोचल्या नसतील तर. पण, अशा काही शेळ्या मेल्या की वृत्तपत्रात मोठ्या बातम्या छापून येतात. एखाद्या जिल्ह्यात हजारो शेळ्या असतात पण त्यातल्या पाच पन्नास शेळ्या मेल्या तरी शेळ्या आता संपत चालल्या की काय अशी अतिशयोक्ती करून चर्चा व्हायला लागते. बँकांचे अधिकारी काही शेळ्या मोजायला जात नाहीत की मरणार्‍या शेळ्यांची मोजदाद करायला जात नाहीत. वृत्तपत्रातल्या बातम्या वाचून त्यांच्याही मनावर परिणाम होतो आणि ते शेळ्या पाळण्यासाठी लोन न दिलेले बरे अशा निष्कर्षाप्रत येतात. शेळ्यांच्या बाबतीत येणारी आणखी एक अडचण म्हणजे जिच्यावर कर्ज घेतले आहे ती शेळी विकता कामा नये यावर बँकांना लक्ष ठेवता येत नाही. शेतकरी कोणत्याही क्षणी उठतो की बाजारात जाऊन शेळी विकून टाकू शकतो. मग कर्ज वसूल कसे करायचे असा बँकांचा प्रश्‍न असतो.

या उपरही काही लोकांना शेळी पालनासाठी लोन मिळते. सर्वांनाच असे लोन मिळणे अवघड आहेे. एका तरुणाने एकदा मला अशाच शेळी पालनासाठी कर्ज मिळण्यात येणार्‍या अडचणी सांगायला सुरूवात केली. तो दोन वर्षांपासून लोन साठी प्रयत्न करीत होता. त्यासाठी त्याने तालुक्याच्या गावी, जिल्हा उद्योग केन्द्रात आणि बँकेच्या हेड ऑङ्गिसमध्ये चकरा मारण्यात किमान दोन तीन हजार रुपये तरी खर्च केला होता. खरे तर त्याने दोन वर्षाखाली तेच दोन हजार रुपये गुंंतवून दोन चार शेळ्या विकत घेतल्या असत्या तर त्यापासून या दोन वर्षात खंडीभर शेळ्यांचे खांड तयार झाले असते. लोन मिळत नसेल तर त्याच्या मागे न लागता अगदी थोडया पैशात हा धंदा सुरू करता येतो. वर्ष दोन वर्षात पिलांची संख्या वाढायला लागते. उगाच लोन लोन करीत बसण्याची गरजच काय ?

या व्यवसायात गुंतवणूक कमी आणि उत्पन्न जास्त आहे. जमा-खर्च, नङ्गा-तोटा याचा ङ्गारसा उपद्व्याप या व्यवसायात नाही. त्यामुळे दारात चार-पाच शेळ्या आणि पाच-सहा बोकड असले की, ती एक शेतकर्‍यांची बचत बँकच होऊन जाते. शेतकर्‍याला दैनंदिन अडचणींमध्ये पटकन् पैसा उपलब्ध होऊ शकत नसतो. मात्र घरात काही शेळ्या आणि बोकड असले की, या अडचणीवर मात करता येते. पटकन् एखादी शेळी किंवा एखादा बोकड बाजारात नेऊन विकून टाकला की, छोटी-मोठी गरज भागून जाते. म्हणजे शेळ्या ही एक बचत बँकच होऊन गेलेली आहे. बँकेतल्या बचत खात्यात पैसे ठेवावेत आणि लागेल तसे काढावेत, तसे शेळीच्या विक्रीतून पैसे काढता येतात आणि पैसे काढले तरी पुन्हा हाती असलेल्या शेळ्यांची पैदास वाढवून शेळ्यांची संख्या वाढतच जाते. सध्या मटणाला भाव ङ्गार आलेला आहे. मटण खाणार्‍यांची संख्याही वाढत चालली आहे. परंपरेने शाकाहारी असलेले अनेक लोक मांसाहार करायला लागले आहेत आणि परंपरेने मांसाहारी असलेले लोक नेहमीपेक्षा अधिक मांसाहार करायला लागले आहेत. त्यामुळे मटणाचे भाव वाढलेले आहेत. शक्यतो मांसाहार करणार्‍यांमध्ये बोकडांचे मांस म्हणजे मटण जास्त खाल्ले जाते.

सध्या मांसाहारी लोकांच्या थाळीमध्ये कोंबडी, काही प्रमाणात अन्य प्राणी यांचे मांस दिसायला लागले आहे. परंतु कोंबडी आणि शेळी यांच्या मांसाचे सेवन ९० टक्के इतके असते. त्यामुळे शेळीची मागणी वाढत चालली आहे. मटणाच्या मागणीचे प्रमाण केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगातच वाढत चाललेले आहे. त्याला काही कारणे आहेत. यूरोप आणि अमेरिकेमध्ये गायीचे आणि डुकराचेही मांस खाल्ले जाते. परंतु डुकराचे मांस नेहमी खाल्ले जात नाही. ते ङ्गार कमी वेळा आणि अधूनमधून खाल्ले जाते. कारण डुकराच्या मांसामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते. गोमांस खाल्ले जाते, परंतु काही कारणांनी गोमांसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. कोंबडी हा एक त्याला पर्याय आहे. परंतु अलिकडच्या पाच-सहा वर्षात कोंबडीला सुद्धा बर्ड फ्ल्यू या विकाराने ग्रासलेले आहे. अशी कोंबडी खाल्ल्यास माणसालाही फ्ल्यू होतो आणि तो जीवघेणा असतो. बर्ड फ्ल्यूची लागण वाढली की, लक्षावधी कोंबड्या मुंड्या मुरगळून मारून उकिरड्यावर टाकल्या जातात आणि त्या पुरल्या जातात.

अशा सार्‍या परिस्थितीमध्ये शेळीचे मांस म्हणजेच मटण हा एक सर्वात चांगला पर्याय राहिलेला आहे, आणि त्यामुळे केवळ भारतातच नव्हे तर सार्‍या जगामध्ये मटणाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. मटणासाठी शेळ्या पाळणे हा व्यवसाय त्यामुळेच अधिक प्राप्तीचा झालेला आहे. कधी जनावराच्या बाजारात चक्कर मारली तर शेळ्या आणि बोकडांसाठी ग्राहकांमध्ये तू मी तू मी चाललेले दिसते. इतकी शेळ्यांची टंचाई जाणवायला लागली आहे. शेळी हा प्राणी बहुतेक सर्व प्रकारच्या हवामानात पाळला जातो. परंतु जगभरातल्या शेळ्यांच्या जवळपास शंभर जातींपैकी २२ जातींचे पालन करणे भारतात शक्य होते. त्यामुळे मटणाची मागणी करणार्‍या सार्‍या देशांचे लक्ष मटणासाठी भारताकडे लागलेले आहेत. शेळी किंवा बोकड हा केवळ मांसासाठी पाळण्याचा प्राणी नाही. शेळीचे दूध हा एक मोठा मार्केटिंगचा विषय आहे. साधारणत: शेळीचे दूध काढून ते विकून पैसा कमावला जात नाही. तसा विचार ङ्गार कोणी केलेला नाही. मात्र त्याचा व्यवसायच करायचा झाल्यास ङ्गार मोठा व्यवसाय होऊ शकतो. परंतु शेळीच्या दुधाला उग्र वास असतो, अशी अडचण नेहमी सांगितली जाते. दुभत्या शेळीपासून बोकूड शक्यतो लांब बांधला तर हा वास टाळता येतो आणि शेळीच्या दुधाचे चांगले मार्केटिंग करता येते.

शेळीच्या दुधामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. कोणत्याही प्राण्याच्या खाद्याचा परिणाम त्याच्या दुधावर प्राधान्याने होत असतो. शेळीला चरायला सोडल्यास आपल्याला असे लक्षात येईल की, ती कोणत्याही एका झाडाचा पाला पोटभर खात नाही. ती चरून येताना कमीत कमी २५-३० वनस्पतींची पाने तिच्या पोटात गेलेली असतात. आपल्या सभोवताली अशा अनेक वनस्पती आहेत की, ज्यांचा औषधी उपयोग आपल्याला ठाऊक नाही आणि ठाऊक असला तरी तो विशिष्ट झाडपाला आपण आरोग्यासाठी खाऊ शकत नाही. त्यातल्या अनेक वनस्पतींची पाने शेळीने खाल्लेली असतात आणि त्या सर्व वनस्पतींचा औषधी गुणधर्म तिच्या दुधात उतरलेला असतो. शेळीचे दूध गायीपेक्षा पातळ असते आणि त्यामुळे ते पचायलाही सोपे असते आणि अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त असते. याचा व्यापारी उपयोग ङ्गारसा कोणी केलेला नाही. आपण जर त्याचा तसा उपयोग करून घ्यायचा ठरवला तर आपल्याला दुधाचे चांगले मार्केटिंग करता येईल

भारतामध्ये शेळीच्या एकंदर २५ जाती पाळता येतात. त्यातील जमनापारी, बिटल, सुरती, मारवाडी, सिरोही आणि बारबेरी या जातींच्या शेळ्या चांगले दूध देणार्‍या असतात. तेव्हा कोणाला प्रयत्न करून शेळीच्या दुधाचे मार्केटिंग करण्याची इच्छाच असेल तर त्यांनी यापैकी एका जातीची शेळी विकत आणून ती पाळावी. परदेशांमध्ये विशेषत: अमेरिकेमध्ये शेळीचे दूध विपूलपणे वापरले जाते. एवढेच नव्हे तर शेळीची दुधासाठी पैदास करणार्‍या शेळी पालकांच्या संघटना सुद्धा तिथे आहेत आणि या संघटना शेळीच्या दुधावर अनेक प्रकारचे प्रयोग करीत असतात. आपल्या देशामध्ये या संबंधात ङ्गारसे काही झालेले नाही. मात्र त्यामुळे शेळी आणि बोकूड हे केवळ मांसासाठी पाळायचे असतात, असा समज रूढ झालेला आहे आणि शेळीचे दूध चांगले पैसे मिळवून देण्याच्या योग्यतेचे असताना सुद्धा त्याची ही क्षमता वाया जात आहे.