कराच्या माध्यमातून यंदा १३.६४ लाख कोटींचे उद्दिष्टे !

tax
नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात सरकार करसंकलनाच्या १३.६४ लाख कोटी रुपये उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात कर संकलित करेल, असा विश्‍वास केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला आहे.

अर्थमंत्री आयकर विभागाचे मुख्य महाआयुक्त, मुख्य महासंचालक, मुख्य आयुक्त व महासंचालकांच्या ३0व्या वार्षिक संमेलनाला संबोधित करत होते. या वेळी त्यांनी आयकर विभागाची विश्‍वासार्हताच त्याची सर्वात मोठी संपत्ती असते, म्हणूनच आयकर विभागाच्या अधिकार्‍यांकडून नीतिमत्तेच्या उच्च मानकांचे अवलंबन अपेक्षित आहे, असे ते म्हणाले . तसेच २0१४-१५ आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट फक्त साध्य करण्यात येणार नाही तर त्यापेक्षा अधिक कर संकलित केला जाईल, असेही ते म्हणाले . केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून एकूण १३.६४ लाख कोटी रुपये उत्पन्नाची अपेक्षा आहे. मागील वर्षी सरकारच्या अपेक्षेपेक्षा कर संकलनात ७७000 कोटी रुपयांची तूट आली होती. मागील वर्षी सरकारने एकूण १२.३५ लाख कोटी रुपयांचे करसंकलन उद्दिष्ट निश्‍चित केले होते. पण प्रत्यक्षात मात्र ११.५८ लाख कोटी रुपये कर संकलित झाला होता.

Leave a Comment