साखर कारखान्यांच्या हंगामाबाबत तीस जुलैला उच्चस्तरीय बैठक – हर्षवर्धन पाटील

patil
पुणे : राज्यातील साखर कारखानाच्या आगामी गाळप हंगामाबाबत येत्या तीस जुलै रोजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक बोलविण्यात आली आहे. या बैठकीत आगामी ऊस गाळप हंगामाबाबत विविध निर्णय घेतले जातील, अशी माहिती सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज येथे दिली.

श्री. पाटील यांनी सांगितले की, 2014-15 च्या गाळप हंगामासाठी ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली असून त्यामुळे ऊस उत्पादनातही वाढ होण्याची शक्यता आहे. यंदा 10.54 लाख हेक्टरवर ऊसाची लागवड झाली आहे. त्यामुळे गाळपासाठी अंदाजे १०.५४ लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड असून गाळपासाठी अंदाजे ७७० लाख मे.टन ऊस उपलब्ध होणे अपेक्षित आहे. सरासरी ८८ लाख मे. टन साखर उत्पादन होईल असा अंदाज आहे.

२०१४-१५ चे गाळप हंगामात अपेक्षित ७७० लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप होण्यासाठी सुमारे १७० साखर कारखाने सुरु होणे आवश्यक आहे. या हंगामासाठी केंद्र शासनाने ९.५० टक्के साखर उताऱ्यासाठी प्रतिटन २२०० रुपये आणि पुढील प्रत्येकी एक टक्का साखर उताऱ्यासाठी प्रतिटनास २३२ रुपये एफआरपी निश्चित केली आहे. यंदाच्या गाळप हंगामासाठी सरासरी साखर उतारा ११.४१ टक्के विचारात घेता सरासरी एफ आरपी २६४३ रुपये प्रतिटन येते, असेही त्यांनी सांगितले.

केंद्र शासनाने जाहीर केलेल्या अबकारी कर कर्ज योजना २०१४ च्या माध्यमातून वाढीव बिनव्याजी कर्ज रु. १९६५.११ कोटी कर्ज मंजूर करण्यात आले आहे. त्यापैकी ८६ सहकारी साखर कारखान्यांना १५८९.३५ कोटी व ३९ खाजगी कारखान्यांना ३७५.७६ कोटी रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे.

चालू वर्षी हंगामाच्या सुरवातीच्या शिल्लक साठ देशपातळीवर ८० लाख मेट्रिक टन तर राज्यपातळीवर १३.७९ लाख मेट्रीक टन राहणार आहे. चालू हंगामातील ८८ लाख मेट्रिक टन उत्पादन विचारात घेता या वर्षी राज्यात १०१.७९ लाख मेट्रीक टन साखर उपलब्ध होणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

Leave a Comment