या देवाला नैवेद्य भिंतीवरच्या घड्याळांचा

ghadi
भारतात देवदेवतांची कमी नाही तसेच प्रत्येक देवदेवतांना भक्तांचीही कांही उणीव नाही. भाषा वेगळ्या असल्या, प्रांत वेगळे असले तरी देवाबाबतची भावना प्रत्येक ठिकाणी सारखीच असते. हिंदू धर्मात तर प्रत्येक देवासाठी खास नैवेद्यही असतो. म्हणजे गोपाळकृष्णाला साखर लोणी तर गणपतीबाप्पाला मोदक. देवीसाठी विविध खीरी, पुरणपोळी तर शंकराला दहीभात. देवाला नैवेद्य दाखवायचा आणि सुखी ठेव किवा कांही इच्छा पूर्ण कर अशी मागणी करायची अशी सर्वसाधारण पद्धत.

उत्तरप्रदेशातील जौनपूर येथील ब्रह्मबाबा मंदिरात मात्र नैवेद्य म्हणून भिंतीवरचे घड्याळ देण्याची प्रथा आहे. त्यामुळे ब्रहमबाबांचे नांव घड्याळ बाबा असेही पडले आहे. गेली ३० वर्षे ही प्रथा सुरू असून मंदिराच्या भिंती, परिसरातील झाडे या भितींवर लावायच्या घड्याळांनी नुस्ती गजबजली आहेत. येथील एकही घड्याळ कधीही चोरीला जात नाही.

असे सांगितले जाते की एका व्यक्तीला आपल्याला वाहन चालविता यावे अशी इच्छा होती म्हणून त्याने तसा नवस या देवाला बोलला. लवकरच तो ट्रक चालवायला शिकला आणि ट्रकचालक झाला. नवस फेडण्यासाठी त्याने भिंतीवर लावायचे घड्याळ विधीपूर्वक मंदिरात दिले आणि तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. नवस कोणताही असला तरी तो फेडायला भिंतीवरचे घड्याळ देऊनच अशी परंपराच पडली असे समजते.

Leave a Comment