मर्सिडीजचा रॉसबर्ग जर्मनी ग्रां प्रि मध्ये विजेता

rosburg
हॉकेनहीम – मर्सिडीजच्या निको रॉसबर्गने येथे झालेल्या जर्मन ग्रां प्रि फॉर्म्युला वन शर्यतीत जेतेपद पटकावले. जर्मनीतील त्याचे हे पहिलेच जेतेपद आहे. या विजयाने त्याने चॅम्पियनशिप रेसमधील आघाडी 14 गुणांवर नेली आहे. विल्यम्सच्या व्हाल्टेरी बोटासने दुसरे व रॉसबर्गचा संघसहकारी लेविस हॅमिल्टनने तिसरे स्थान मिळविले.

अपघात झाल्याने विल्यम्सचा बोटासचा सहकारी फेलिप मासाचा प्रारंभीच निवृत्त व्हावे लागले. पोल पोझिशनवरून सुरुवात करणाऱया रॉसबर्गचे हे या मोसमातील चौथे व कारकिर्दीतील सातवे जेतेपद आहे. मर्सिडीजसाठी जर्मनीतील हा 1954 नंतरचा पहिलाच विजय आहे. 1954 मध्ये जुआन मॅन्युअल फँजिओने त्यांना येथील शर्यत जिंकून दिली होती. रॉसबर्गने 67 लॅप्सची ही शर्यत बोटासपेक्षा 20.7 सेकंद कमी वेळ घेत पूर्ण केली तर हॅमिल्टनने बोटासपेक्षा 1.8 सेकंद जादा घेतले. रेड बुलच्या सेबॅस्टियन व्हेटेलने चौथे फेरारीच्या फर्नांडो अलोन्सोने पाचवे, रेड बुलच्या डॅनियल रिकार्डोने सहावे, फोर्स इंडियाच्या निको हल्केनबर्गने सातवे, मॅक्लारेनच्या जेन्सन बटनने आठवे, त्याचाच सहकारी केव्हिन मॅग्नसेनने नववे व फोर्स इंडियाच्या सर्जिओ पेरेझने दहावे स्थान मिळविले.

Leave a Comment