नारायण राणेंची कारणमीमांसा

rane
मुंबई – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीतील झालेल्या पराभवानंतरही महाराष्ट्रात अपेक्षीत उपाययोजना केलेल्या नाहीत त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागणार असे चित्र आहे आणि आगामी निवडणुकीत पराभवाचा वाटेकरी होण्याची माझी इच्छा नसल्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिला असे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्याचबरोबर सध्या फक्त मंत्रिपदाचा राजीनामा दिला असून पक्षाचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरणही राणे यांनी दिले आहे.

नारायण राणे यांनी आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सोपवल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन ‘ना’राजी नाम्याची कारणे दिली. सहा महिन्यांमध्ये काँग्रेसने मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले होते. पण नऊ वर्ष वाट बघूनही मला मुख्यमंत्रीपद दिले नाही. पक्षाने माझ्यासोबत आलेल्यांना न्याय दिला नाही अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

काँग्रेसने लोकसभा पराभवानंतर राज्यात काही पावले उचलायला हवी होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ नये यासाठी उपाययोजना राबवणे गरजेचे होते. मात्र दुर्दैवाने अद्याप तसे झालेले नाही असे राणेंनी सांगितले. जनतेसंबंधीचे निर्णय वेळेवर घेतले जात नाही, निर्णय झाल्यास त्याची अंमलबजावणी होत नाही. मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर वचक नाही अशा शब्दात राणेंनी मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला. पक्ष आणि सरकारमध्ये समन्वय नाही. निवडणुकीतील पराभव ही सामूहिक जबाबदारी असते. आगामी विधानसभा निवडणुकीतील या पराभवाच्या सामूहिक जबाबदारीतील घटक होण्याची इच्छा नसल्याने मी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी नमूद केले.

राणे आज संध्याकाळी पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. पुढील भूमिका मुख्यमंत्र्यांनी माझा राजीनामा स्वीकारल्यानंतर स्पष्ट करीन असे राणेंनी म्हटले आहे. सोनिया गांधींशी चर्चा करुन निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्याविषयी राणेंना सांगितले आहे.

Leave a Comment