द. आफ्रिकेने केला श्रीलंकेचा दणदणीत पराभव

afrika
गॅले – रविवारी येथे खेळाच्या शेवटच्या दिवशी `सामनावीर’ डेल स्टीन आणि मोर्नी मॉर्कल यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर द. आफ्रिकेने यजमान श्रीलंकेचा 153 धावांनी दणदणीत पराभव करत दोन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली.

दोन्ही संघांना या सामन्यात खेळाच्या चौथ्या दिवसाअखेर विजयाची समान संधी होती. लंकेने 1 बाद 110 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. पण संगकारा आणि सिल्वा हे बाद झाल्यानंतर लंकेचे इतर फलंदाज स्टीन आणि मॉर्कल यांच्या गोलंदाजीसमोर ढेपाळले. लंकेचे शेवटचे आठ गडी 98 धावांत बाद झाले. संगकारा आणि सिल्वा यानी दुसऱया गडय़ासाठी 104 धावांची भागीदारी केली. स्टीनने सिल्वाला झेलबाद केले. त्याने 5 चौकारांसह 38 धावा जमविल्या. मॉर्कलने महेला जयवर्धनेला तर डुमिनीने संगकाराला बाद करून लंकेवर चांगलेच दडपण आणले. जयवर्धनेने 10 धावा तर संगकाराने 145 चेंडूंत 1 षटकार आणि 9 चौकारांसह 76 धावा जमविल्या. कर्णधार मॅथ्युजने एकाकी लढत देत 70 चेंडूंत 1 षटकार आणि 3 चेंडूंत नाबाद 27 तसेच हेराथने 4 चौकारांसह 20 धावा जमविल्या. मॉर्कलने इरंगाला खाते उघडण्यापूर्वी झेलबाद करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. लंकेचा दुसरा डाव 71.3 षटकांत 216 धावांत आटोपला. स्टीनने 45 धावांत 4 तर एम. मॉर्कलने 29 धावांत 4 तसेच डुमिनीने 38 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात स्टीनने 99 धावांत 9 गडी बाद केले. या मालिकेतील दुसरी आणि शेवटची कसोटी गुरुवार दि. 24 जुलैपासून कोलंबोत खेळविली जाईल.

Leave a Comment