दुष्काळप्रश्नी शासन जनतेच्या पाठीशी ठाम उभे – उपमुख्यमंत्री अजित पवार

ajit-pawar
सोलापूर : राज्यात सध्या समाधानकारक पाऊस नाही. भविष्यात उद्‌भवणाऱ्या पाणी, चारा टंचाई (दुष्काळ) प्रश्नी शासन सर्वोतपरी जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. पाऊस समाधाकारक न झाल्यास उद्भवणा-या परिस्थितीचा मुकाबला शासन व अधिकारी एकत्र येऊन समर्थपणे करतील यात अजिबात शंका बाळगण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दिलीप सोपल, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार हनुमंत डोळस, आमदार दिलीप माने, आमदार दिपक आबा साळुंखे, आमदार श्यामल बागल, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. निशीगंधा माळी, महापौर अलका राठोड, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजाराम झेंडे, माजी आमदार राजन पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी श्री. पवार म्हणाले की, उजनी धरणामध्ये उपलब्ध असणारे पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्यास यापुढे प्राधान्य देण्यात येईल. भविष्यातील स्थिती लक्षात घेता जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घ्यावा. तसेच यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील जनतेला दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी गेल्या 4 वर्षात विविध रूपाने सुमारे 1266 कोटी इतक्या रुपयांची मदत राज्य शासनाने केली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व 11 तालुक्यात टंचाई निवारणार्थ करण्यात येणाऱ्या कामांची वाटणी समप्रमाणात व्हावी.

श्री. सोपल म्हणाले की, ज्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली आहेत अशा शेतकऱ्यांचा पुन्हा नव्याने यादीत समावेश करावा.

आमदार बबनदादा शिंदे यांनी शासनाने चारा छावण्या सुरू करण्याबाबत शासनाने सकारात्मक विचार करावा, अशी सूचना केली. माजी मंत्री आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे म्हणाले की, बोअरवेल घेण्यासाठी सुमारे चारशे फूट खाली खोदण्याची परवानगी मिळावी. तर आमदार श्री. डोळस यांनी माळशिरस तालुक्यासाठी एन.आर.बी.सी. ने उजव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी केली.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. गेडाम यांनी जिल्ह्यातील सद्य स्थिती बद्दल माहिती सांगतांना नरेगा, चारा, बियाणे, खत, जनावरांच्या छावण्या, टँकर, पाणी पुरवठ्याच्या विविध योजना, कोल्हापूर व सिमेंट बंधारे, रोहयो, सद्य:स्थितीत उजनीत उपलब्ध असणारे पाणी आदी बाबत माहिती सांगून संभाव्य दुष्काळी स्थितीत जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनांची माहिती दिली.

या आढावा बैठकीसाठी जिल्हा पोलीस अधिक्षक मकरंद रानडे, मनपा सह. आयुक्त डॉ. पंकज जावळे, मनपा उपायुक्त अमिता दगडे, कृषी अधिक्षक रफीक नाईकवाडी, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता अजय दाभाडे, भीमा कालवा मंडळाचे अधिक्षक अभियंता बबन तोंडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई, जिल्हा उपनिबंधक बी.टी. लावंड, महावितरणचे श्री. साळे यांच्यासह प्रमुख अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.