काळापैसा तपास चर्चा- स्विसकडून भारताला बोलावणे

swiss
दिल्ली- स्वित्झर्लंडच्या बँकातून करचुकव्या आणि राजकारणी लोकांनी दडविलेल्या काळ्या पैशांच्या तपासाबाबत अधिक चर्चा करण्यासाठी स्वित्झर्लंडच्या वित्त मंत्रालयाने भारतीय अधिकार्‍यांना बोलावणे पाठविले असल्याचे वृत्त आहे. ही बैठक बर्न येथे हेाणार असल्याचे समजते.

भारताने काळ्या पैशांच्या तपासादरम्यान मागितलेली कांही माहिती यापूर्वीच दिली गेली आहे असे स्विस वित्त मंत्रालयाकडून सांगितले जात असले तरी जर्मनी आणि फ्रान्सकडून भारताने मिळविलेल्या माहितीनुसार खातेदारांची माहिती देण्यास स्वित्झर्लंडने नेहमीच नकार दिला आहे. बँकेतील कांही माजी कर्मचार्‍यांना हाताशी धरून ही माहिती मिळविली गेली आहे आणि ही माहिती बेकायदेशीर मार्गाने मिळविली गेल्यामुळे त्या खात्यांसंबंधी कोणतीही माहिती दिली जाणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

मात्र भारताकडून स्विस बॅकातून दडविल्या गेलेल्या काळ्या पैशांबाबत सातत्याने विचारणा केली जात असल्याने या बँकांवरील दबाव वाढत चालला आहे. परिणामी चर्चेसाठी स्विस वित्त मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे. यापूर्वी फेब्रुवारी २०१४ मध्ये अशी एक बैठक पार पडली होती. २०१३ मध्ये भारताने अशा खात्यांची माहिती देण्यासंदर्भात १३८६ विनंती अर्ज संबंधित बँकांकडे केले असल्याचेही समजते.

Leave a Comment