आऊटलूकच्या विरोधात पोळ यांचा अब्रुनुकसानीचा दावा

gulabrao-pol
पुणे – पुण्याचे माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱयांना शोधण्यासाठी ‘प्लँचेट विधी’ केल्याची बातमी खोटी असून, फक्त चर्चेसाठी ही बातमी प्रसिध्द केल्याचा दावा केला आहे. ‘आऊटलूक’चे मुख्य संपादक तसेच पत्रकार आशिष खेतान यांच्या विरोधात खोटी बातमी प्रसिध्द केल्या प्रकरणी अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आल्याची माहिती आज पुण्यात पोळ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पोळ यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप या वेळी फेटाळून लावले आहेत. पुण्याचे तत्कालीन पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी त्यांच्या ‘ऍन्टी चेंबर’मध्ये डॉ. दाभोलकर यांच्या मारेकऱयांना शोधण्यासाठी प्लँचेट विधी केल्याची बातमी ‘आऊटलूक’मध्ये प्रसिध्द झाली होती. त्यानंतर पोळ यांच्या चौकशीची मागणी राज्यभरातून करण्यात आली होती. त्यावर ‘आऊटलूक’चे मुख्य संपादक तसेच पत्रकार आशिष खेतान यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आल्याची माहिती पोळ यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी पोळ यांचे वकील ऍड. हर्षद निंबाळकर उपस्थित होते.

Leave a Comment