धूम्रपानामुळे मृत्यू झाल्या प्रकरणी पत्नीला मिळणार १.४२ लाख कोटी

smoking
मियामी- अमेरिकेच्या न्यायालयाने धूम्रपानामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे त्याच्या पत्नीला नुकसान भरपाईपोटी मृत्यूस जबाबदार ठरलेल्या सिगारेट कंपनीला २३.६ बिलीयन अमेरिकन डॉलर (एक लाख ४२ हजार २६१ कोटी रुपये) देण्याचा आदेश दिला आहे. अमेरिकेच्या सर्वात मोठ्या दुस-या क्रमांकाच्या आरजे रेनॉल्ड्स टोबॅको कंपनीला फ्लोरिडा येथील न्यायालयाने हे आदेश दिले आहेत. नुकसान भरपाईपोटी इतकी मोठी रक्कम देण्याचा फ्लोरिडा येथील हा ऐतिहासिक निर्णय आहे.

न्यायालयाने याप्रकरणात नुकसान भरपाईपोटी १०८ कोटी देण्याचे आदेश दिले होते. मात्र दुस-या दिवशी पुन्हा सुनावणी झाली असता सिगारेट कंपनीला एक लाख ४२ हजार २६१ कोटी रुपये देण्याचा आदेश फ्लोरिडा न्यायालयाने दिला.

धूम्रपान करणा-या मायकल जॉनसन याचा १९९६ मध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाने मृत्यू झाला. त्याची पत्नी सिंथिया रॉबिन्सन हिने २००६ मध्ये आरजे रेनॉल्ड्स टोबॅको कंपनी विरोधात न्यायालयात दावा ठोकला. कंपनीने आपल्या पतीला धूम्रपानामुळे स्वास्थ्य बिघडू शकते, याची कल्पना दिली नव्हती. धूम्रपानामुळेच एका हॉटेलमध्ये बस चालक असलेल्या आपल्या पतीचा वयाच्या ३६ व्या वर्षी मृ्त्यू झाला. त्याला सिगारेट कंपनीच जबाबदार असल्याचा आरोप सिंथिया हिने केला होता. वयाच्या १३ व्या वर्षापासून मायकल धूम्रपान करत असे. त्याने ब-याच वेळा सिगारेट सोडण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तो मरेपर्यंत धूम्रपान सोडू शकला नाही.

Leave a Comment