राणेंनी डागली कॉंग्रेसवरच तोफ ,शब्द कुठे पाळला

rane
सिंधुदुर्ग – प्रदेशाध्यक्ष, प्रचारप्रमुख अशी पदे मी यापूर्वीच नाकारली आहेत. छोटया पदांचा मी भुकेला नसून मी महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे माझे समाधान करण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, असा पुनरुच्चार करतानाच काँग्रेसने नऊ वर्षापूर्वी दिलेला शब्द पाळला नाहीच. त्यामुळे मी नाराज आहे, अशा शब्दात उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसवरच तोफ डागली शिवाय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही मला डिवचू नका अन्यथा … असा इशाराही दिला आहे. नारायण राणे यांनी सावंतवाडी विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह सर्वच विरोधकोंचा खरपूस समाचार घेतला.

जिल्हयातील जनता निर्भयपणे वावरत असताना कथित दहशतवादाचा मुद्दा घेऊन जिल्हा भयमुक्त करण्याच्या बाता मारणा-या उद्धव ठाकरेंचा राणे यांनी शेलक्या शब्दांत समाचार घेतला. मातोश्रीवरून कधीही बाहेर न पडलेल्या भ्याड माणसाने दहशतविरोधाच्या गमजा मारू नयेत. आमदार केसरकरांची करंगळी पकडून आधी जिल्हयात येऊन येथील वातावरण पहावे. माझ्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अनेक राजकीय पुढारी तोंडसुख घ्यायला लागले आहेत. मात्र, रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत मी त्यांचा आवाज बंद केला आहे. त्यांची ही वटवट अशीच सुरू राहिल्यास मी गप्प बसणार नसून त्यांचे वस्त्रहरणच करीन, असा इशाराही त्यांनी दिला.लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या कृपेने यश मिळालेल्या शिवसेनेने शेफारून जाऊ नये. स्वतःला मर्द म्हणवणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील आपल्या वॉर्डातही फिरू शकत नाहीत. अशांनी मला डिवचू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव यांनीच छळले. माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आपली पात्रता काय आहे, हे आधी तपासावे, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांना फटकारले. मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन काँग्रेस हायकमांडने पाळले नाही. मला स्वतःसाठी पद नको होते, तर महाराष्ट्राच्या विकासाला नवे परिमाण द्यायचे होते. तरीही मी नाराज नाही. सोमवारी मी राजीनामा देणार आहे. जिल्हावासीयांना विश्वासात घेऊनच मी माझे निर्णय घेईन, हे सांगण्यासाठीच आणि तुमचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दौरा आहे.असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले .

नऊ वर्षे मी संयम पाळला… – माझ्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात वादळ उठले आहे. हे ‘कोकण वादळ’ शमणार नाही. गेली दोन वर्षे मी शांत होतो. त्याचा गैरफायदा घेत अनेकांनी माझ्यावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, या कृतीशून्य, कार्यशून्य व राजकारणाने पछाडलेल्या व्यक्तींनी यापुढे तोंड उघडल्यास गप्प बसणार नाही,माझा राजीनामा हे कोणतेही बंड नसून केवळ भावना व्यक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. गेली नऊ वर्षे मी संयम पाळला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी मला काँग्रेसमध्ये प्रवेश देताना दिलेला शब्द पाळला नाही. त्यामुळे माझी समजूत काढण्याचा, मला मार्गदर्शन व प्रबोधन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. असा असेही राणे यांनी यावेळी नमूद केले

Leave a Comment