भयावह वास्तव ;मणिपूर ‘एचआयव्ही’च्या विळख्यात

hiv
इम्फाळ : देशाच्या ईशान्येकडील डोंगरदर्‍यांमध्ये वसलेल्या मणिपूरला प्राणघातक ‘एचआयव्ही’चा विळखा पडल्याचे भयावह वास्तव एका अहवालातून समोर आले आहे. मार्च २00७ ते मार्च २0१४ या कालखंडात राज्यातील एचआयव्हीग्रस्तांच्या संख्येत वाढ झाल्याचे नियंत्रक व महालेखा परीक्षकांच्या (कॅग) अहवालातून समोर आले आहे. या अहवालानुसार, मार्च २00७ मध्ये मणिपूरमधील एचआयव्हीग्रस्तांची संख्या २५,९१९ इतकी होती. मार्च २0१२ मध्ये ती वाढून ४0 हजार ८५५ वर पोहोचली आहे.

कॅगने नुकताच सादर केलेला ३१ मार्च २0१३ या आर्थिक वर्षापर्यंतचा लेखापरीक्षण अहवाल मणिपूर विधानसभेत मांडण्यात आला. कॅगच्या या अहवालात मणिपूरमधील ‘एचआयव्ही’ग्रस्तांविषयीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये मार्च २0१२ पर्यंत ४0,८५५ लोकांना ‘एचआयव्ही’ची लागण झाल्याचे यात म्हटले आहे. राज्यातील एचआयव्हीग्रस्तांचा उंचावता आलेख पाहता राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम तीनची सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली की नाही, याबद्दल शंका उपस्थित होते. ‘एचआयव्ही’ व ‘क्षयरोगा’सारख्या प्राणघातक आजारांचे योग्य निदान न झाल्याने अनेक नागरिक मृत्युमुखी पडल्याचे या अहवालात म्हटले आहे. विविध गंभीर आजारांचे निदान करून त्यांच्या उपचारासाठी सरकारने एका विशेष कार्यक्रमांतर्गत ४३.३९ कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र याची योग्य फलनिष्पत्ती झाली नसल्याचेच दिसून येत आहे, असे ताशेरे कॅगने ओढले आहेत. त्यामुळे सध्या जिवंत असलेल्या क्षयरोग व ‘एचआयव्ही’ग्रस्त नागरिकांच्या आयुष्याची निश्‍चित खात्री देता येत नाही, असे कॅगने म्हटले आहे. एड्स तसेच एचआयव्हीच्या प्रतिबंधासाठी ३.२५ कोटी रुपयांची करण्यात आलेली तरतूद लाभदायी ठरली नसल्याचे ताशेरे कॅगने ओढले आहेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment