रात्री निळ्या प्रकाशात चमकणारा समुद्र किनारा

maldiv
समुद्र किनार्‍यावर जायचे या नुसत्या कल्पनेनेच माणूस आनंदी होतो. विशाल समुद्र, सतत एका गतीने येत राहणार्‍या लाटा, लाटांची धीरगंभीर गाज मनाला शांती देते हा अनुभव जवळजवळ प्रत्येकाला येत असतो. रात्रीचा समुद्रही अशीच भुरळ पाडतो पण तो चांदण्या रात्री. मात्र रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र अथवा चांदणे नसतानाही किनारा निळ्या रंगात चमकणारा असेल तर? ही कवी कल्पना नाही तर वास्तव आहे. असा किनारा अनुभवायचा असेल तर मालदिवला जायला हवे.

येथील वढू आयलंड चा किनारा हे स्वप्नातील दृष्य प्रत्यक्षात आणतो. मालदिवची राजधानी माले पासून जवळच असलेला हा किनारा रात्री निळ्याशार रंगाने नुसता झगमगत असतो. किनार्‍यावर एकही दिवा नसला तरी हा निळा प्रकाश असतोच असतो. ही प्रकाशाची निळी जादू दाखविणार्‍या या किनार्‍याला म्हणूनच ओशन ऑफ स्टार्स किवा सी ऑफ स्टार्स म्हणून ओळखले जाते. येथे जणू आकाशातील तारेच समुद्राच्या पाण्यात उतरले आहेत असा भास होतो.

या निळ्या प्रकाशमयी जादूमागचे रहस्य आहे ते या पाण्यात असणारे अगदी छोटया वनस्पतींसारखे दिसणारे एक प्रकारचे जीवाणू. त्यांना फायटोप्लांकटन असे नांव आहे. दिवसा हे जीव समुद्राच्या पाण्यावर येतात आणि सूर्यप्रकाश शोषून घेतात. रात्र पडली की हे जीवाणू तो प्रकाश नीळ्या रंगात बाहेर टाकतात. जगातील सर्वात सुंदर नॅचरल लाईट हे जीव बाहेर टाकतात. विशेष म्हणजे या वेळी तुम्ही समुद्राच्या ओल्या रेतीत ज्या आकृती काढता त्याही निळ्या रंगाने चमकून उठतात आणि हे दृष्य पाहण्यासाठी दोन डोळे पुरे पडत नाहीत.

या ठिकाणी जाण्यासाठी दिल्ली, श्रीलंका, क्वालालंपूर येथून थेट विमानसेवाही आहे. किनार्‍यावर उत्तमोत्तम हॉटेल्स आहेत. दिल्लीहून जायचे असेल तर किमान २३ हजार ते १ लाख रूपये पर्यंत खर्चाची तयारी ठेवावी लागेल.

Leave a Comment