नारायण राणे यांची कोंडी

rane
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला अपयश आले असल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना डच्चू द्यावा अशी मागणी कॉंग्रेस पक्षातले काही नेते करीत आहेत. या नेत्यांत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे आघाडीवर आहेत. आणि पक्षश्रेष्ठींनी ही मागणी मान्य केली तर आपला नंबर लागेल अशी आशा लागून असलेल्यांत नारायण राणे आघाडीवर आहेत. पक्षश्रेष्ठींना हे मान्य आहे की, पृथ्वीराज चव्हाण हे अपयशी ठरले आहेत पण त्यांनी नेतृत्व बदलाची मागणी करणारांना एक पेच टाकला आहे. नारायण राणे यांनाही हा पेच टाकला गेला आहे. आम्ही पृथ्वीराज चव्हाण यांना हटवू आणि तुम्हाला नेमू पण तुम्ही येत्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून दाखवणार आहात का ? त्यांना हटवून तुम्हाला त्या पदावर नेमले तर पक्ष विधानसभा निवडणुकीत विजयी होईल का? खरे तर पराभव झाला की नेतृत्व बदलले जाते. नव्या नेत्याला विजयाची खात्री विचारली जात नाही. नारायण राणे तसेच समजून चालले होते. चव्हाण पराभूत झाले म्हणून त्यांना काढा आणि मला नेमा अशी त्यांची मागणी होती. पण त्यांच्यापुढे पेच ठेवून पक्षश्रेष्ठींनी नैतृत्व बदलाला अप्रत्यक्षपणे खोच घातला आहे. नाहीतरी पृथ्वीराज चव्हाण यांना या पदावर ठेवण्याने तरी विजयाची शक्यता आहे का ? मग त्यांना ठेवून विजय मिळणार नसेल तर प्रयोग म्हणून आपल्याला मुख्यमंत्री करायला काय हरकत आहे असा युक्तिवाद राणे यांनी करायला हवा होता पण ते तिथे कमी पडले आणि आता पक्षाला धक्का देण्यास सरसावले आहेत.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दहा वर्षांपासून नारायण राणे सतत चर्चेत आहेत पण त्यांनी आपले म्हणणे श्रेष्ठींच्या गळी उतरवण्यासाठी सतत राजीनाम्याचे शस्त्र वापरून ते एवढे बोथट करून टाकले आहे की ते आता चेष्टेचा विषय व्हायला लागले आहे. आता तर या राजीनाम्याच्या धमकीचा प्रकार इतका निरर्थक ठरणार आहे राणे यांनी कॉंग्रेसचा त्याग केला तरीही त्यांना आता आत घ्यायला कोणताही मोठा पक्ष तयार नाही. त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत आणि दिला तरीही त्याचा काहीही परिणाम राजकारणावर होणार नाही याची खात्री लोकांना वाटत आहे. हास्यास्पद वाटावी अशी महत्त्वाकांक्षा, तेवढाच कमी मुत्सद्दीपणा आणि आत्मकेंद्रित वृत्ती यामुळे एखाद्या राणे यांनी आपली स्वत:चीच ससेहोलपट करून घेतली आहे. त्यांना आता कॉंग्रेसमध्ये फार वाईट दिवस आले आहेत. त्यांना शिवसेनेची दारे बंद झाली आहेत आणि कॉंग्रेसमध्येही कोंडी झाली आहे. अशा अवस्थेत नेमके काय करावे असा संभ्रम त्यांच्यासमोर आहे.

आपल्या क्षमतेचा वापर कॉंग्रेसमध्ये नीट करून घेतला जात नाही असे ते म्हणत असतात. त्यांची ती कथित क्षमता नेमकी काय आहे हे त्यांचे त्यांनाच माहीत.त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांची संघटनात्मक ताकद फार मोठी आहे असे म्हणावे तर तसेही कधी आढळलेले नाही. उलट अनुभव वाईट आहे. शिवसेनेतून बाहेर पडून कॉंग्रेसमध्ये येताना ते जेमतेम ११ आमदारांना घेऊन आले होते. तेव्हाच त्यांची ती ताकद लक्षात आली होती. परंतु ते सातत्याने, अजून काही खासदार आणि आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत होते. पण प्रत्यक्षात त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांची संख्या ११ च्या पुढे गेली नाही. त्यातलेही ७ आमदार पुन्हा शिवसेनेत आले आहेत आणि उरलेले ४ आमदार त्यांच्या घराणेशाहीला कंटाळले आहेत. नारायण राणे सुरूवातीपासून वेगवेगळ्या कारणाने रुसले आहेत आणि रुसवा काढताच पुन्हा सुतासारखे सरळ झालेले आहेत. आताही त्यांनी येत्या सोमवारी राजीनामा देणार असे सांगून राजकीय भूकंप होणार असल्याचे भाकीत केले आहे. त्यांच्या या भूकंपाचे धक्के सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या एक दोन तालुक्याशिवाय कोणालाही जाणवणार नाहीत. किंबहुना ते ज्या प्रकाराने भूकंपाचे भाकित करत आहेत त्या प्रकाराकडे पाहिले म्हणजे ते नक्कीच राजीनामा देणार आहेत की नाही याविषयी शंका येते. कारण ते खरोखर राजीनामा देणार असते तर त्यांनी सोमवारचा मुहूर्त सांगण्याची गरज नव्हती. ते राजीनाम्याची हूल उठवून पक्षश्रेष्ठींवर दबाव आणून काहीतरी पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

त्यांनी गुरुवारी सोमवारचा मुहूर्त जाहीर केला मग गुरुवारी राजीनामा का दिला नाही? यात बर्‍याच गोष्टी दडलेल्या आहेत. अजूनही महाराष्ट्रातल्या बर्‍याच लोकांना सोमवारी भूकंप होईल असे वाटत नाही. कारण राणे यांनी कितीही निर्धार केला तरी त्यांच्या भुकंपास अनुकूल वातावरण नाही. नारायण राणे यांना कॉंग्रेसमधून बाहेरच पडायचे असेल तर ते फार तर मनसेत जाऊ शकतात किंवा स्वतःचा पक्ष स्थापन करू शकतात आणि अशा त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडणार नाही. राणे यांना सिंधुदुर्ग मतदारसंघात आपल्या मुलाला निवडून आणता आलेले नाही. त्यांच्या जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आमदार दीपक केसरकर हे शिवसेनेत गेले असून त्यांनी शिवसेेनेची ताकद वाढवून राणे यांच्या कथित ताकदीवर मोठा आघात केलेला आहे. तेव्हा राणे आता काहीच करू शकत नाहीत अशा अवस्थेत आहेत.

Leave a Comment