गाझापट्टी – इजिप्त; १२000 बोगदे नष्ट

tunnel
नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून इस्रायलकडून होणार्‍या हल्ल्यांमुळे धुमसत असलेली गाझापट्टी सध्या चर्चेत आहे.पण या भागाचे एक वैशिष्टे आहे ते म्हणजे भूमिगत बोगदे ! या भागात एक आगळी भूमिगत अर्थव्यवस्था असून ती बोगद्यांच्या माध्यमातून चालणार्‍या तस्करीचे मोठे नेटवर्क आहे. बोगद्यांचे हे जाळे इजिप्तला जोडते. इजिप्त व गाझादरम्यान अन्नधान्य, औषधे, निर्मितीसामग्री, शस्त्रास्त्रे व अन्य वस्तूंच्या आयातीसाठी त्याचा वापर केला जातो. मात्र, सध्या इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे त्यांची हानीही होत आहे. इस्रायल नेहमीच या बोगद्यांना लक्ष्य करत आला आहे. याच बोगद्यांच्या मार्गे इजिप्तमधून शस्त्रास्त्रांच्या तस्करीचे काम चालते, असा इस्रायलला संशय आहे. मागील काही वर्षांत इस्रायलने गाझातील असे अनेक बोगदे नष्ट केले आहेत. मात्र, गाझामध्ये जेवढे बोगदे नष्ट होतात, तेवढे लगेच दुसरीकडे खोदले जातात. त्यांच्यातून इंधन तेलाचीही आयात होते. गाझातील एकमेव वीजनिर्मिती केंद्र चालवण्यासाठी आयात तेलावर अवलंबून राहावे लागते. २0१३मध्ये इजिप्तने शेकडो बोगदे नष्ट केले होते, तेव्हा गाझाचे हे वीजनिर्मिती केंद्र बंद झाले होते. इजिप्त व गाझापट्टीला जोडणारे हे बोगदे अनेकदा बंद केले गेले आहेत. २00९मध्ये त्यातील रहदारी रोखण्यासाठी भूमिगत अडथळे निर्माण करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा सुमारे १२000 बोगदे नष्ट करण्यात आले. या बोगद्यांतून ये-जा करण्यासाठी एक तिकीटही जारी करण्यात आले होते, त्यांची किंमत स्थानांनुसार ३0 ते ३00 डॉलरपर्यंत होती.

Leave a Comment