लोभाचे फळ

chitfund
कोणताही शहाणा गुंतवणूकदार एक गोष्ट सारखी सांगत असतो की, गुंतवणूक करताना एक पथ्य पाळा. गुंतवणुकीवर अवाजवी परतावा देण्याचे आश्‍वासन देणारांकडे पैसे गुंतवू नका. कारण परताव्याचे आश्‍वासन जेवढे मोठे तेवढा गुंतवलेला पैसा बुडण्याची शक्यता जास्त. असे असूनही गावागावात जादा परताव्याचे आमिष दाखवणार्‍या योजनांचे पेव फुटलेले असते आणि सारे काही माहीत असूनही जादा पैशाच्या लोभापायी त्या योजनांत सतत नवे नवे गुंतवणूकदार फसत असतात. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ अशी मराठीत म्हण आहे पण तरीही पुढचे लोक ठेचा खाऊन मरत असतानाही मागचे लोक चक्क डोळे उघडे ठेवून त्याच दगडावर ठेचकाळत राहतात. याला काय म्हणावे? मागचा कोणी फसला असला तरीही आपल्यासमोर आलेली ही योजना वेगळी आहे आणि तिच्यात फसण्याची शक्यता नाही अशी त्याची खात्री पटवलेली असते आणि तोही ती योजना वेगळी आहे असे म्हणून तिच्यात आपल्या आयुष्यातली सारी अनमोेल कमायी घालवून बसतो. दुनिया झुकती है मगर झुकानेवाला चाहिए असे म्हणतात तसे होते. झुकाने वाला तयार होता है आणि झुकनेवाले हजारो पैदा होते है.

सध्या महाराष्ट्रात केबीसी घोटाळा गाजत आहे. तसा स्थानिक पातळीवर नेहमीच एखादा घोटाळा गाजत असतो. कोणीतरी जास्त व्याजाचे आमिष दाखवून लोकांना फसवून पळ काढतो आणि लोक नंतर फसलो म्हणून गळा काढतात. कहाणी तीच पण प्रत्येकीचे नाव वेगळे. आता नाशिक मधल्या नाईट बिलियन क्लब म्हणजेच केबीसी या घोटाळ्यावर खूप चर्चा सुरू आहे. या ग्रुपने महाराष्ट्राच्या विविध भागातील लोकांना पैसे गुंतवण्यासाठी अनेक प्रकारची आमिषे दाखवली. थोड्याच काळात पैसे दुप्पट किंवा चौपट करतो अशी भुरळ पाडली की लोक पैसे गुंतवण्यासाठी रांगा लावतात आणि भराभर अशा अहमहमिकेने पैसे गुंतवतात की योजनेच्या प्रायोजकाला सुध्दा आश्‍चर्य वाटते. केबीसी घोटाळ्याचे असेल झाले आहे. काही कोटी रुपयांची अपेक्षा धरून केबीसीच्या प्रवर्तकाने लोकांच्या भोवती जाळे टाकले पण त्यांना तर अल्पकाळात अब्जावधी रुपये मिळाले. आजपर्यंत आपल्या देशामध्ये सहारा, शारदा चिटफंड, समृध्दी, कल्पवृक्ष अशा कितीतरी योजना येऊन गेल्या. त्या सर्वांची कहाणी सारखीच आहे. त्यँका आणि तत्सम सर्व अधिकृत गुंतवणूक यंत्रणांमध्ये ७ टक्के आणि जास्तीत जास्त १० टक्के परतावा मिळत असताना या कंपन्या त्यापेक्षा कितीतरी अधिक परताव्याचे आश्‍वासन देतात.
अशा कंपन्यांच्या काही योजनांमध्ये तर अविश्‍वसनीय एवढ्या परताव्याचा वायदा केलेला असतो. एखादी गुंतवणुकीची योजना प्रामाणिकपणे पण कौशल्याने आखली असेल तर ती सामान्य परताव्यापेक्षा दोन ते तीन टक्के अधिक परतावा देऊ शकेल पण या कंपन्यांचा परताव्याचा वायदा अवाच्या सवा आणि कोणताही शहाणा माणूस विश्‍वास ठेवणार नाही असा असतो. सध्या बाजारामध्ये बरेच लोक अशा परताव्याच्या योजना राबवतात. कर्जाचा व्याजदर प्रत्यक्षात १६ टक्के म्हटला जात असला तरी तो १८ ते २० टक्क्यांपर्यंत जातो. असा एखादा कर्जदार ही वस्तुस्थिती समजावून सांगून लोकांना दरमहा २ टक्के म्हणजे वार्षिक २४ टक्के व्याजदर देऊ करतो. ही फार आतिशयोक्ती नाही आणि बरेच सेवानिवृत्त लोक दरमहा २ टक्के किंवा वार्षिक २० टक्के या दराने अशा लोकांकडे पैसे गुंतवतही असतात. यातही काही लोक बुडतात. परंतु दरमहा २ टक्के हे आतिशयोक्त आमिष नाही. केबीसीसारख्या योजनांत मात्र २ वर्षांत दामदुप्पट आणि ५ वर्षांत चौपट असले काहीतरी आमिष दाखवलेले असते आणि हे कसे शक्य आहे हे नाना पध्दतीने समजून सांगितलेले असते.

अशा रितीने पैसा मोठा झाला की किती प्रकारचे फायदे होतील, घरात कसे वैभव येईल याचे रंगीन चित्र गुंतवणूकदारांच्या डोळ्यांसमोर उभे केले जात असते. बँकांच्या मुदत ठेवीत पैसा ठेवणे हे कसे मूर्खपणाचे आहे आणि त्यामुळे आपला पैसा वाढण्याच्या ऐवजी प्रत्यक्षात चलनवाढीच्या तुलनेत कसा घटत असतो. याचेही गणित लोकांसमोर मांडलेले असते. महागाई कशी वाढत आहे आणि पुढच्या पाच वर्षात आपले उत्पन्न दुप्पट झाले नाही तर आपल्याला आपले राहणीमान सांभाळणे कसे मुश्किल होणार आहे याचेही गणित मांडले जात असते. या सगळ्या गणिताला भाळून लोक अशा योजनांत पैसे गुंतवतात. त्यातल्या काही लोकांनी तर आपल्या आयुष्यातली सगळी पुंजी गुंतवलेली असते. ती जर बुडली तर त्यांच्या हातात एकही पैसा शिल्लक राहणार नसतो आणि नंतर त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ येणार असते. तरीही असे लोक आपला सारा पैसा अशा योजनेत गुंतवतात आणि तो पैसा बुडल्यानंतर हाय हाय करीत जगतात. दरवर्षी भारतामध्ये एक तरी मोठी अशी योजना निघते, बुडते आणि तिच्यात गुंतवणूक करणारे रडतात. त्यांच्या बातम्या प्रसिध्द होतात. संसदेत आणि विधानसभेत त्यांच्यावर चर्चा होते पण एवढे होऊनही लोक पुन्हा नव्या योजनेच्या मागे लागतात. तिच्यात मान अडकवतात. याला मूर्खपणा म्हणावे नाही तर काय म्हणावे?

Leave a Comment