शेतीला जोड धंदे आवश्यकच

farmer
शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणीत जगत असतो. बारोमास त्याची तंगी असते. विदर्भ आणि मराठवाड्यात तर शेतकरी मोठया संख्येने आत्महत्या करतात. गेल्या दहा वर्षात एकट्या विदर्भात साठ हजार शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे सरकारनेच जाहीर केले आहे. शेती आणि शेतीच्या अडचणी राज्याच्या सगळ्याच भागांत असताना केवळ विदर्भातलेच शेतकरी मोठ ्या संख्येने आत्महत्या का करीत असावेत? यावर अनेक प्रकारांनी अभ्यास करण्यात आला आहे. अनेक आयोग आणि समित्या नेमून झाल्या आहेत पण अजून तरी या आत्महत्यांची नेमकी कारणेही सापडलेली नाहीत आणि त्यावर प्रभावी इलाजही योजिण्यात आलेला नाही. जो तो तज्ञ त्यावर आपली मते व्यक्त करतो. पण खरी कारणे शोधण्यात आली पाहिजेत.

या भागातले शेतकरी केवळ शेतीच करीत असतात. शेतीतसुद्धा एकच एक पीक घेत असतात. त्याच्या शेती धंद्याला कसलीही जोड नाही. मग असा शेतकरी त्याच्या एकाच एका पिकावर काही रोग कीड पडली की अगदीच उघडा पडतो. त्याला कसला आर्थिक आधारच रहात नाही. तो अशा प्रसंगी सावकाराचे पाय धरतो आणि यथावकाश कर्जाच्या सापळ्यात सापडला की आत्महत्येचा मार्ग पत्करतो. अशा शेतकर्‍याकडे एखादे दुभते जनावर असते. एखादी म्हैस असती. शंभर दोनशे कोंबड्या असत्या तर त्याला हा मार्ग पत्करावा लागला नसता. आत्महत्येची कारणे तपासण्यासाठी तज्ञांचे आयोग नेमले जात आहेत आणि अभ्यास गटही नियुक्त केले जात आहेत पण त्यातल्या कोणीही हा सोपा उपाय का सांगत नाहीत याचे आश्‍चर्य वाटते. कोरडवाहू आणि कापसाचे पीक घेणार्‍या शेतकर्‍यांना दहा-पाच शेळ्या किंवा दोन गायी घेऊन द्या मग बघा त्याची कर्जाच्या विळख्यातून सुटका होते की नाही. ही काही अतिशयोक्ती नाही. २००२ ते २००५ या काळात विदर्भात हातचे पीक गेले म्हणून शेतकरी आत्महत्या करीत होते. तीच चार वर्षे सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यात सलग तीन चार वर्षे पावसाने अवकृपा केली होती. पण या जिल्ह्यात विदर्भाप्रमाणे शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या नाहीत. याचे कारण काय ?

या दोन जिल्ह्यातले शेतकरी शेळ्या, मेंढ्या, गायी आणि म्हशी बाळगून होते. निसर्गाने अवकृपा केली तरीही या जोडधंद्यातून होणार्‍या प्राप्तीत त्यांनी या अवकृपेशी सामना केला. तेव्हा दुष्काळी शेतकर्‍यांना तरी जोड धंदा हे वरदानच असते. सतत अनिश्‍चित उत्पन्नामुळे अडचणीचे जीवन जगणार्‍या शेतकर्‍यांसाठी त्यांचा खिसा अधूनमधून खुळखुळवणारे साधन म्हणून जोडधंदा उपयुक्त असतोच. परंतु शेतकर्‍यांनी जोडधंदा शेती व्यवसायाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे. म्हणजेच शेळ्या, मेंढ्या, गायी, म्हशी, कोंबड्या यांचे पालन करताना उत्पन्नाचे साधन म्हणून त्यांच्याकडे पाहिले पाहिजेच. परंतु सेंद्रीय शेतीसाठी आवश्यक असणारे मटेरियल देणारे साधन म्हणूनही त्याकडे पाहिले पाहिजे. म्हणजे गायी आणि म्हशींचे पालन करताना दूध उत्पादन हा तर हेतू असतोच. पण दुधाबरोबर शेणावरही लक्ष ठेवले पाहिजे. विशेषत: सध्या तर काही शेतकरी शेणासाठीच प्रामुख्याने गोपालन करायला लागले आहेत. आपल्या शेतीचे अर्थचक्र आणि तंत्र अनुकूल करण्याचे साधन म्हणून ते शेणाचा वापर करत आहेत. शेणामुळे आणि गोमूत्रामुळे त्यांचे रासायनिक खतांवरचे खर्च क मी होत आहेत. पर्यायाने औषधांवरचे खर्चही टळत आहेत आणि पिके चांगली येत आहेत.

एकंदरीत शेतकर्‍यांच्या सर्वात डोकेदुखीचा उत्पादन खर्चाचा प्रश्‍न सोडवणे गोपालनामुळे शक्य झालेले आहे. अलिकडे तर गायीच्या शेणापासून काही संवर्धकेही तयार व्हायला लागली आहेत आणि ती तयार करणारे शेतकरी गायीच्या दूधापेक्षा सुद्धा शेणाचा आणि गोमूत्राचा पैसा जास्त होतो असे म्हणायला लागले आहेत. त्याशिवाय देशी गाय पाळली तर बैलही मिळतात. म्हणजे एकंदरीत हातात पैसा रहावा यासाठी तर जोडधंदे करायचे आहेतच. पण शेती सुधारण्यासाठीही ते करायचे आहेत. सध्या महाराष्ट्रात बंद गोठा शेळीपालन करणार्‍या तरुणांचीही संख्या वाढत आहे. शेतकर्‍याला कर्जाच्या आणि अनिश्‍चिततेच्या चक्रातून सोडवण्याची ताकद शेळीपालनात आहे. कारण या धंद्यात एकदा शेळ्या विकत आणल्या की त्यांचे पालन करायला काही खर्च येत नाही. उलट शेळी पालन करताना आणि नवे खांड उभे करताना शेळीची जात आवर्जुन पाहिली तर जास्त फायदा होतो कारण महाराष्ट्रात संगमनेरी आणि उस्मानाबादी शेळी पाळली तर तिला एका वेळी दोन दोन पिली होतात. काही वेळा तीनही होतात. शेळीचे वेत सात महिन्याला असते. त्या मानाने विचार केला तर एक शेळी वर्षाला आपली संख्या किमान दीड ते दोन पट करते. त्या तुलनेत शेळीवर खर्च नगण्य होतो. तेव्हा शेळीपालन हा शेतीतल्या नष्टचर्यातून बाहेर पडण्याचा जालीम उपाय आहे. केवळ जालीमच नाही तर सोपा आणि कमीत कमी भांडवलात करण्याजोगाही आहे. हा व्यवसाय करताना किमान किती शेळयांपासून सुरू करावा यालाही काही बंधन नाही. अनेक लोक एक दोन शेळ्या पाळतात. त्याच्यावरही त्यांचे बजेट सांभाळले जात असते. तेव्हा आपण एकेका जोड धंद्याची माहिती घेऊ या.

Leave a Comment