बालकांचा आहार ,उत्पादनावर ‘आयएसआय’ अनिवार्यच

child
मुंबई : तान्ही बाळे आणि लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या वापरात येणार्‍या दुधाच्या बाटल्या तसेच आहार भारतीय मानक ब्युरोतर्फे (आयएसआय) प्रमाणित असाव्यात. आयएसआयचे चिन्ह नसलेल्या उत्पादनांची विक्री केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इसारा भारतीय मानक ब्युरोतर्फे देण्यात आला आहे.

तान्ही बाळे आणि लहान मुलांची सर्वांगीण वाढ हा मातांसाठी चिंतेचा विषय राहिला आहे. पुरेसे पोषण आणि बालकांसाठीची योग्य उत्पादने तान्ह्या बाळांचे आरोग्य आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. बाळाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहावे यासाठी दर्जेदार उत्पादनांचा वापर अनेक वर्षांपासून होत आहे. ही गरज ओळखून, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लहान बाळांच्या पोषणासाठीच्या अनेक उत्पादनांना अनिवार्य प्रमाणीकरणाच्या छताखाली आणले आहे. भारतीय मानक ब्युरो अशा उत्पादनांचे काम पाहते. दुधाच्या प्लास्टिक बाटल्या, प्रक्रियायुक्त धान्य आधारित घन आहार, पूरक आहार आदींचा यात समावेश आहे. यासंबंधीच्या १९९२च्या कायद्यातील कलम ११ (२) अन्वये कोणतीही व्यक्ती दुधाच्या बाटल्यांवर आयएसआय हे प्रमाण चिन्ह असल्याशिवाय अशा बाटल्या विकू अथवा वितरित करू शकत नाही. तसेच अन्नसुरक्षा आणि प्रमाण कायदा २00६ नुसार कुणीही भारतीय मानक ब्युरोचे आयएसआय हे प्रमाणचिन्ह नसलेली लहान बाळांच्या आहारासंबंधीची उत्पादने निर्माण, विक्री किंवा प्रदर्शन करू शकत नाही.

सामुग्रीच्या दर्जाकडे दुर्लक्ष नको – प्लास्टिकच्या बाटल्यांचा सर्रास वापर केला जातो. या बाटल्यांचे प्रमाणीकरण करताना त्यासाठी वापरण्यात येणारी सामुग्री, तिचा दर्जा, रचना आणि आकार, बाटलीवरील प्रमाणाबाबतची सविस्तर माहिती आदींचा विचार केला जातो. मातेच्या दुधाला अंशत: किंवा संपूर्ण पर्याय म्हणून अशा प्रकारची उत्पादने आणली जातात. याबाबतचे प्रमाणीकरण करताना, योग्य प्रमाणात ते तयार केले आहे का हे पाहिले जाते, जेणेकरून बाळाच्या वाढीसाठी पोषण व्यवस्थित मिळेल आणि त्याच्या पचनावर परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनीही या वस्तू घेताना त्या आयएसआय प्रमाणित आहेत किंवा नाहीत हे पाहवे, असे आवाहन मानक ब्युरोच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment