पूर्व युक्रेन नो फ्लाईंग झोन जाहीर

malaysia
पूर्व युक्रेन भागात गुरूवारी मलेशियन विमानावर मिसाईल डागून ते पाडले गेल्यानंतर युक्रेनियन अॅथॉरिटीने युक्रेनचा पूर्व भाग नो फ्लाईंग झोन म्हणून जाहीर केला आहे. युरोपियन फ्लाईट सेफ्टी बॉडी युरो कंट्रोलने ही घोषणा केली आहे. मलेशियाचे हे विमान अॅमस्टरडॅमहून क्वालांलंपूर येथे जात असताना ते पाडण्यात आले. विमान १० हजार मीटर उंचीवरून जात होते.

येथील युद्धग्रस्त भागातून जात असलेले मलेशियन एअरलाईन्सचे एम १७ बोईंग प्रवासी विमान बक सरफेस मिसाईल डागल्याने रशिया युक्रेन सीमेवर गुरूवारी अपघातग्रस्त झाले. या अपघातात विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मिळून २९५ जण ठार झाले आहेत. ही मिसाईल जमिनीवरूनच दहशतवाद्यांनी डागली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर युरोपियन आणि यूएस एअरलाईन्सनी त्यांची विमाने अन्य मार्गाने वळविली असल्याचेही समजते.या घटनेसाठी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांनी युक्रेन सरकारला दोषी ठरविले आहे.

चार महिन्यांपूर्वीच मलेशियाचेच एमएच ३७० हे प्रवासी विमान हिंद महासागरात गुढरित्या नाहिसे झाले होते. त्यापाठोपाठ घडलेल्या या घटनेने आपल्याला मोठा धक्का बसल्याची प्रतिक्रीया मलेशियाचे पंतप्रधान नजीब रजाक यांनी व्यक्त केली आहे. याच भागात रशियाच्या वायुदलाची दोन विमाने पाडल्याचा दावा युक्रेनमधील दहशतवाद्यांनी केला आहे. मलेशियन विमानावरील हल्ल्याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी चर्चा केल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment