पीसीबीवर शोएब अख्तरची टीका

shoaib
कराची : सध्या लंकन दौऱयावर असलेल्या पाक संघासमवेत तब्बल 10 पदाधिकाऱयांना पाठवले असल्याच्या निर्णयावर पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरने जोरदार टीका केली आहे. `ज्या पदाधिकाऱयांना पाठवले आहे, त्यातील एकालाही अगदी व्यवस्थित बोलता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे, त्याचा काहीच लाभ होणार नाही’, असा दावा अख्तरने केला.

पाक क्रिकेट मंडळ केवळ पगारावरच 150 दशलक्ष रुपये खर्ची टाकत आहे. तसेच 700 पेक्षा अधिक कर्मचारी तैनात आहेत. पण, त्याची उपयुक्तता कुठेच दिसून येत नाही. मी स्वतः खेळत असताना याच्या निम्मे कर्मचारी होते आणि जो पैसा खर्च व्हायचा, तो केवळ क्रिकेटवरच होत असे. आता मात्र जणू सारी परिस्थितीच बदलून गेली आहे, असे शोएबने सांगितले. `सहायक प्रशिक्षक किंवा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक पाठवण्याचे कारण काय, याचा आताही उलगडा होत नाही. यापूर्वी केवळ मॅनेजर, फिजीओ व ट्रेनर असे तिघेच जण संघासमवेत दौऱयावर असायचे. आता मात्र बऱयाच जणांना केवळ मर्जी सांभाळण्यासाठीच पाठवले जात असावे’, असेही तो म्हणाला.

`माझ्या मते अगदी मुख्य निवडकर्त्याची देखील काहीच गरज नाही. इम्रान खानसारखा कणखर कर्णधार असेल तर तो खेळाडूंना प्रेरणा देखील देऊ शकतो. शिवाय, उत्तम नेतृत्व साकारत खेळाडूंकडून दर्जेदार कामगिरी देखील करवून घेऊ शकतो. अलीकडे मंडळाने डझनभर पदाधिकाऱयांना दौऱयावर धाडण्याची मालिका सुरु केली आहे. मात्र, प्रत्यक्षात त्याची शून्य फलिते दिसून आली आहेत’, याचा शोएबने पुढे उल्लेख केला.

Leave a Comment