डुमिनीच्या नाबाद शतकाने द. आफ्रिका सुस्थितीत

duminy
गॅले – पहिल्या कसोटीत गुरुवारी खेळाच्या दुसऱया दिवशी दक्षिण आफ्रिकेने डुमिनीच्या नाबाद शतकाच्या बळावर पहिला डाव 9 बाद 455 धावांवर घोषित केला. त्यानंतर दिवसअखेर लंकेने बिनबाद 30 धावा जमविल्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे एलगार आणि डुमिनी यांनी शतके तर डु प्लेसिस आणि डिकॉक यांनी अर्धशतके झळकविली. लंकेच्या परेराने 4 तर लकमलने 3 गडी बाद केले.

दक्षिण आफ्रिकेने 5 बाद 268 या धावसंख्येवरून दुसऱया दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. लकमलने नाईट वॉचमन स्टीनचा 3 धावांवर त्रिफळा उडविला. डिकॉक आणि डुमिनी या जोडीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण परेराने डिकॉकला झेलबाद केले. त्याने 6 चौकारांसह 51 धावा जमविल्या. उपाहारावेळी दक्षिण आफ्रिकेने 7 बाद 331 धावापर्यंत मजल मारली. डुमिनीने एका बाजूने चिवट फलंदाजी करत धावसंख्येला बऱयापैकी आकार दिला. डुमिनी आणि फिलँडर यांनी आठव्या गडय़ासाठी अर्धशतकी भागीदारी 131 चेंडूंत नोंदविली. डुमिनीने 99 चेंडूंत 6 चौकारांसह अर्धशतक झळकविले. चहापानापर्यंत दक्षिण आफ्रिकेने 149 षटकांत 8 बाद 414 धावांपर्यंत मजल मारली. डुमिनी आणि फिलँडर यांनी आठव्या गडय़ासाठी 75 धावांची भर घातली.

फिलँडरने 3 चौकारांसह 27 धावा जमविल्या. खेळाच्या शेवटच्या सत्रात डुमिनीने 10 चौकारांसह 206 चेंडूंत शतक झळकविले. एम. मॉर्कलसमवेत त्याने नवव्या गडय़ासाठी अभेद्य 66 धावांची भर घातल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 9 बाद 455 धावांवर डावाची घोषणा केली. डुमिनीने 10 चौकारांसह नाबाद 100 तर मॉर्कलने 4 चौकारांसह नाबाद 22 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेच्या 4 फलंदाजांनी 187 धावा जमविल्या. लंकेतर्फे परेराने 4 तर लकमलने 3 गडी बाद केले. हेराथ आणि मॅथ्यूज यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

लंकेने आपल्या पहिल्या डावाला सुरुवात केल्यानंतर दिवसअखेर 12 षटकांत बिनबाद 30 धावा जमविल्या. सिल्व्हा 8 तर थरंगा 4 चौकारांसह 20 धावांवर खेळत आहे.

Leave a Comment