हृदयविकारावर जगातील पहिली लस लवकरच!

insulin
नवी दिल्ली : हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यास साह्यभूत ठरू शकणार्‍या ‘टी-सेल पेप्टाईड’वर आधारित अनोख्या लसीची कल्पना शास्त्रज्ञांनी मांडली असून, ही लस विकसित झाल्यास जगातील लाखो लोकांचे प्राण वाचविणे शक्य होणार आहे. हृदयविकारास कारणीभूत ठरणार्‍या कोलेस्टेरॉलचे प्रमाण या लसीमुळे नियंत्रणात ठेवले जाऊ शकणार आहे.

मानवी शरीरातील धमन्यांच्या आतील बाजूला येणारी सूज कमी करणार्‍या एका अनोख्या लसीची कल्पना अमेरिकेतील संशोधकांनी मांडली आहे. या लसीमुळे हृदयविकारावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याशिवाय पक्षाघातास कारणीभूत ठरणार्‍या रक्तातील प्लाकवरही या लसीमुळे नियंत्रण ठेवले जाऊ शकेल, असे या अभ्यासाचे प्रमुख संशोधक व वेन विद्यापीठातील वैद्यकीय विद्यालयाचे प्राध्यापक हार्ले त्से यांनी सांगितले. उंदरांवर केलेल्या या लसीच्या प्रयोगादरम्यान उंदरांच्या रक्तातील ‘अँथेरोस्क्लेरोटिक प्लाक’चे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. अँटोअँन्टीजेन ‘अपो बी१00’ मधील दोन ‘टी-सेल्स’ हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतात, असे या अभ्यासातील दुसरे प्रमुख संशोधक मिकाईल शॉ यांनी सांगितले. या ‘टी-सेल्स’मुळे धमन्यांना आतून बाजूला सूज येऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो. याच ‘टी-सेल्स’च्या निर्मितीवर नियंत्रण ठेवतील, अशी प्रतिकार शक्तीवर आधारित लस विकसित केल्याचे शॉ म्हणाले. रक्तातील ‘टी-सेल्स’ला ओळखून त्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचे काम या लसीद्वारे केले जाणार आहे. याविषयीचे संशोधन ‘इम्युनोलॉजी अँण्ड क्लिनिकल रिसर्च’ या नियतकालिकात छापून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही