नवी दिल्ली – देशातील 70 लाख शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणारे 115 कोटी एसएमएस संदेश पाठविण्याचे प्रचंड कार्य गेल्या वर्षभरात कृषी मंत्रालयाच्या पोर्टलद्वारे करण्यात आले. हे पोर्टल 16 जुलै 2013 पासून सुरू झाले. त्यात 2660 कृषीतज्ञ आणि अधिकारी शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत एसएमएसद्वारे शेतीसंबंधी सल्ला देत असतात. 78 हजार मार्गदर्शक सूचना पाठविण्यात आल्या तसेच नंतर शंका समाधान करण्यात आले.
शेतकऱ्यांना एसएमएस द्वारे मार्गदर्शन
इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या शासकीय माहितीचा इलेक्ट्रॉनिक्स पध्दतीने व्यवहार करणाऱ्या पोर्टलमध्ये शेती मंत्रालयाच्या या पोर्टलचा पहिला क्रमांक आहे.
किसान कॉल सेंटरमध्ये नांव नोंदणी करून शेतकऱ्यांना असा सल्ला विनामूल्य मिळविता येतो. 1800 180 1551 या विना आकार क्रमांकावरून किंवा http://farmer.gov.in/advs/webreg.aspx या वेबसाईटवर ही नोंदणी करता येते. स्थानिक शेती कार्यालये किंवा सेवा केंद्रातूनही या सोयीचा फायदा घेता येईल. शेती, सहकार, पशुसंवर्धन,दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय या विषयातील आणि हवामान वेधशाळा आदि विभागांचे अधिकारी, राज्य शासनाची गट स्तरावरील कार्यालये,कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यातील तज्ञ मार्गदर्शक करतात.
12 भाषेत सध्या फोनेटीक टायपिंगने संदेश पाठविले जातात. 43.56 कोटी शेतकऱ्यांना 2 पेक्षा जास्त वेळा संदेश पाठविण्यात आला आहे.
ग्रामीण भागात इंटरनेटचा प्रसार मोठया प्रमाणात अद्याप झालेला नाही. मात्र, ग्रामीण क्षेत्रात सेवा 40 कोटी मोबाईल आहेत त्यामुळे संदेशासाठी मोबाईल हेच अधिक उपयुक्त साधन आहे.