मुंबई : अंधेरी येथील लिंग रोडवर लोटस बिझनेस पार्कमध्ये 21 व्या मजल्यावर आग लागली आहे. ही आग जोरदार वाऱ्यामुळे अधिक भडकली आहे. तर अग्निशमन दलाचे काही जवान इमारतीत अडकले आहेत.
लोटस पार्कमधील आग आणखी भडकली
आगीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश आले आहे. अग्निशमन दलाच्या 20 गाड्या आणि 12 पाण्याचे टॅंकर घटनास्थळी पोहोचले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, वाऱ्यामुळे आग अधिकच भडकली आहे. त्यामुळे 21 व्या मजल्यावरची आग 22 व्या मजल्यावर पसरली आहे. आगीमुळे इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे.
33 जवान आग आटोक्यात आण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, वाऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यास अपयश येत आहे. आगीच्या ज्वाला भडकत असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठिण होत आहे. परिसरात धुराचे लोट दिसून येत आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाने हेकॉप्टरची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
काचेची इमारत असल्याने आगीमुळे काचा तडकत आहेत. आगीत इमारतीचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या इमारतीत अभिनेता ऋतिक रोशन याचे कार्यालय आहे. ऋतिकनेही घटनास्थळाला भेट दिली आहे. आग प्रचंड मोठी असूनही घटनास्थळी एकाही राजकीय नेत्याने भेट दिलेली नाही.