इंडोनेशियाकडून वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना हरताळ

forest
जकार्ता : पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्यासाठी जगभरातील राष्ट्रांकडून केल्या जाणार्‍या वनसंवर्धनाच्या प्रयत्नांना इंडोनेशियाकडून हरताळ फासला जात असल्याचे ‘नेचर क्लायमेट चेंज’ या मासिकात प्रकाशित झालेल्या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. त्यात इंडोनेशियात सर्वात जास्त वृक्षतोड होत असल्याचे म्हटले आहे. वृक्षतोडीच्या बाबतीत इंडोनेशियाने ब्राझीलला मागे टाकल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अमेरिकेच्या मेरिलँड विद्यापीठ व जागतिक नैसर्गिक संपदा संस्थेच्या चमूने इंडोनेशियाच्या वनमंत्रालयाच्या सहकार्याने २000 ते २0१२ या बारा वर्षांच्या कालखंडातील इंडोनेशियातील जंगलांच्या आकडेवारीचा अभ्यास करून तयार केलेल्या एका अहवालात येथील वृक्षतोडीच्या प्रमाणात अमर्याद वाढ झाल्याचे म्हटले आहे. ‘२000 ते २0१२ या कालखंडातील इंडोनेशियातील प्राथमिक वनक्षेत्राची घटती संख्या’ या शीर्षकाखालील हा अहवाल ‘नेचर क्लायमेट चेंज’ या मासिकाने प्रकाशित केला आहे. या अहवालानुसार २0१२ पर्यंत इंडोनेशियातील जवळपास ८ लाख ४0 हजार हेक्टरवरील वनक्षेत्रात बेसुमार वृक्षतोड झाली असून, हे क्षेत्र ब्राझीलच्या दुप्पट आहे. ब्राझीलमध्ये याच कालखंडात ४ लाख ६0 हेक्टरवरील वनक्षेत्रातील वृक्ष तोडण्यात आले आहेत.

या देशांमध्ये होत असलेली अमर्याद जंगलतोड ही चिंतेचा विषय असल्याचे या अभ्यासाच्या प्रमुख बेलिंडा अरुणावती मार्गोनो यांनी सांगितले. यापैकी बरीच वृक्षतोड ही घरे बांधण्यासाठी झाली असून, यामुळे येथील दुर्मिळ होत चाललेल्या विविध वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे मार्गोनो म्हणाल्या. वृक्षतोडीसोबतच येथील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाणही वाढले आहे. इंडोनेशिया कार्बन उत्सर्जनाच्या बाबतीत जगात तिसर्‍या क्रमांकावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. या अहवालानुसार तब्बल १५ कोटी ७९ लाख हेक्टर क्षेत्रावरच्या जंगलावर येथील नागरिक व व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. इंडोनेशियात दरवर्षी जवळपास ४७,६00 हेक्टरवरील वनक्षेत्रातील झाडांची कत्तल होते, असे या अहवालात म्हटले आहे. तर ब्राझीलमध्ये यंदा जवळपास १ लाख १३ हजार हेक्टर जंगलांवर ‘करवत’ फिरली आहे.

Leave a Comment