लंडन : आयसीसीने गॉर्डन लुईस यांची इंग्लिश गोलंदाज जेम्स अँडरसनविरुद्ध गैरवर्तणूक प्रकरणी दिवाणी आयुक्तपदी निवड केली आहे. लॉर्ड्स कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी अर्थात, दि. 22 जुलै रोजी याप्रकरणी सुनावणी होईल. इंग्लंडच्या अँडरसनवर रवींद जडेजाला प्रथम ढकलल्याचा व नंतर त्याला अपशब्द उच्चारल्याचा ठपका आहे. नॉटिंगहम येथे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱया दिवशी उपाहाराचा ब्रेक झाला, त्यावेळी ही घटना घडली होती.
अँडरसनविरुद्ध तक्रारीवर 22 जुलैला निर्णय
`गॉर्डन लुईस एएम हे आयसीसी शिस्तपालन आयोगाचे ऑस्ट्रेलियन प्रतिनिधी असून इंग्लंड क्रिकेट संघाने त्यांची बाजू मांडल्यानंतर कलम 5.2 नुसार लुईस यांची निवड केली गेली आहे’, असे आयसीसीने एका पत्रकाद्वारे नमूद केले. प्राथमिक सुनावणीला अँडरसन, त्याचे कायदेशीर प्रतिनिधी व आयसीसीचे नियुक्त वकील उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सदर सुनावणी टेलिफोन कॉन्फरन्सवर होणार असून लुईस त्यात सर्व बाजू ऐकून घेतील व त्यानंतर सुनावणीची रुपरेषा निश्चित करतील, असेही आयसीसीने म्हटले.