दहीहंडी उत्सवातून बाल गोविंदा तडीपार

dahi-handi
मुंबई : राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाने दहीहंडी उत्सवात गोविंदांच्या पथकांमध्ये बाल गोविंदांना बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. बारा वर्षांखालील मुलांना दहीहंडीमध्ये सहभागी होण्यास या आदेशानुसार मज्जाव करण्यात आला आहे.

यासंदर्भातली माहिती बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष उज्ज्वल उके यांनी दिली आहे. दहीहंडीचा सोहळा 18 ऑगस्ट रोजी होणार आहे. सगळ्यात वरच्या थरावरुन दहीहंडी फोडण्यासाठी बालगोविंदांचा सहभाग दहीहंडीमध्ये केला जातो. मात्र अनेक वेळा गोविंदा मंडळांनी लावलेले मनोरे कोसळतात.

यामध्ये जखमी होणाऱ्या बालगोविंदांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी बारा वर्षाखालील गोविंदांना यापुढे दहीहंडीमध्ये सहभाग घेता येणार नसल्याचे आदेश बालहक्क परिषदेने दिला आहे.

दहीहंडीचा उत्सव एक महिन्यावर आला आहे. त्यामुळे गोविंदा पथकांची तयारी सुरु असतानाच बालहक्क संरक्षण आयोगाच्या एक निर्णयाने दहीहंडी उत्सवाच्या उत्साहावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

बालहक्क संरक्षण आयोगाच्या निर्णयाविरोधात गोविंद पथक तसंच दहिहंडी आयोजकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयोगाचा हा निर्णय अयोग्य असल्याचे सांगत अशी बंदी घालणे चुकीचे असल्याचा आरोप गोविंदा पथकांनी केला आहे.

Leave a Comment