आवाज हेही उत्तम भांडवल

singer
परमेश्‍वराचे आपल्याला दिलेला आवाज हे एक उत्तम भांडवल आहे. त्याचा नीट व्यापारी उपयोग केला तर आपण स्वतंत्र व्यावसायिक म्हणून उभे राहू शकतो आणि त्यातून उत्तम कमायी करू शकतो. आता लता मंगेशकर, महमद रफी एवढी मोठी नावेही घेण्याची गरज नाही, पण गायक होणे हा एक व्यवसाय आहेच. अर्थात तो फार कमी लोकांना साध्य होतो. आपण या लेखात चर्चा करणार आहोत ती गाण्यासाठीच्या आवाजाची नाही तर बोलण्यासाठीच्या आवाजाची. आवाज उसना देणे हा एक चांगला व्यवसाय आहे आणि या व्यवसायाला आता फार चांगले पैसेही मिळायला लागले आहेत. आवाजाचा उपयोग करून आपण उद्घोषक म्हणून चांगले काम करू शकतो. रेल्वे स्थानक, बस स्थानक, विविध देवालये आणि गर्दीच्या ठिकाणी येणार्‍या लोकांना सारख्या काही तरी सूचना द्याव्या लागतात आणि ध्वनीवर्धकावरून त्या खणखणीत आवाजात दिल्या नाहीत तर गर्दी नियंत्रित करणे अशक्य होते. तेव्हा लोकांना समजेल अशा उच्चारासह उत्तम उद्घोषणा करणार्‍यांची गर्दीच्या ठिकाणी नेहमीच गरज असते. विवाह समारंभात सुद्धा अशा उद्घोषकांना नेहमी मागणी असते. विवाह समारंभाला येणार्‍या थोरा-मोठ्यांचे स्वागत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

एकेक पाहुणा यायला लागला की, त्याच्या नावाची घोषणा करून, ज्या कुटुंबाचा विवाह समारंभ असेल त्या कुटुंबाकडून त्या आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत अशी घोषणा करावी लागते. पंचायत समितीचे माननीय सभापती श्री. संपतराव शिंदे यांचं आगमन झालेलं आहे, पाटील आणि देशमुख कुटुंबातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करत आहोत अशी साधीच घोषणा असते, पण ती आकर्षक आवाजात आणि जमल्यास आलंकारिक शब्दात केली तर सर्वांनाच ते आवडते आणि ज्यांचे स्वागत केले जाते त्यांनाही आनंद होतो. विवाहाच्या समारंभामध्ये अशा बर्‍याच उद्घोषणा असतात आणि त्या चांगल्या आवाजात दिल्या गेल्या तर समारंभाची शोभा वाढते. असा उद्घोषक अधूनमधून काही हलकाफुलका विनोदही करायला लागला तर समारंभाची लज्जत वाढू शकते. असे उद्घोषक एखाद्या समारंभाचे सूत्रसंचालनही करू शकतात आणि आजकाल सूत्रसंचालनाला फार महत्व आलेले आहे. चांगला सूत्रसंचालक कार्यक्रमाची मजा वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर काही सूत्रसंचालक आपल्या उत्तम वाचनाच्या जोरावर कार्यक्रमाची उंचीही वाढवू शकतात. अशा उद्घोषकांना आणि सूत्रसंचालकांना मानधन सुद्धा चांगले मिळते. सध्या आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारचे समारंभ व्हायला लागले आहेत. परंतु त्या समारंभांना चांगले उद्घोषक आणि सूत्रसंचालक मिळत नाहीत ही अडचण आहे. या अडचणींचा लाभ घेऊन विविध शहरांमध्ये बर्‍या-वाईट पद्धतीच्या सूत्रसंचालकांचे पीक आलेले आहे आणि हे लोक पैसाही मस्त कमवायला लागले आहेत.

अनेकदा काही प्रदर्शने भरवली जातात. त्या प्रदर्शनातही उद्घोषकाची गरज असते. प्रदर्शनास आलेल्या पाहुण्यांची घोषणा करणे, गाळेधारकांना विविध सूचना करणे अशी कामे हे उद्घोषक करतात आणि त्या बदल्यात त्यांना चांगला पैसा मिळू शकतो. करमणुकीच्या कार्यक्रमातले उद्घोषक तर हजारो रुपये कमवतात. मिमिक्री, ऑर्केस्ट्रा अशा प्रकारच्या कार्यक्रमात तर हे सूत्रसंचालक लाखो रुपये फी घेत असतात. याच उद्घोषकांना आवाज उसना देऊन करता येणारा एक चांगला व्यवसाय म्हणजे जाहिरात व्यवसाय. या व्यवसायात तर आवाजाची एवढी मागणी आहे की, चांगले आवाज शोधून काढावे लागतात. अर्थात ही सगळी कामे करताना स्पष्ट उच्चार, शुद्ध भाषा या गोष्टी आवश्यक असतातच पण ऐन वेळी एखादी छान कॉमेंट करण्याइतकी तल्लख बुद्धी आणि हजरजबाबीपणाही असावा लागतो. सांस्कृतिक आणि वैचारिक स्वरूपाच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करणारा चांगला सूत्रसंचालक व्हायचे असेल तर त्या विषयाचा अभ्यास सुद्धा असावा लागतो.

टीव्ही किंवा रेडिओवरून काही वेळा काही लोकांच्या मुलाखती घ्याव्या लागतात आणि त्या बदल्यात सुद्धा चांगला पैसा मिळतो. मात्र सूत्रसंचालक म्हणून आपण किती अभ्यास केलेला आहे आणि किती वाचन केले आहे याचा कस तिथे लागत असतो. काही माध्यमांना व्यावसायिक स्वरूपात कंत्राटावर बातम्या वाचणारे न्यूज रिडर पाहिजे असतात. तोही व्यवसाय म्हणून चांगला आहे. या निमित्ताने एखादा होतकरू तरूण आवाज आणि वाचन यांच्या आधारे पुढे सरकत गेला आणि त्याने चांगला सराव केला तर हळू हळू कार्यक्रमांमध्ये पाहुण्यांचा परिचय करून देणे, प्रास्ताविक करणे, आलेले संदेश वाचून दाखवणे अशीही कामे तो करायला लागतो आणि खरोखरच एखाद्या विषयाचा व्यासंग वाढवला तर तो त्या विषयावर तासभर भाषणही करू शकतो. अशा वक्त्यांना आजकाल चांगली मागणी आहे आणि उत्तम मानधनासह त्यांना सतत निमंत्रणे येत असतात. मात्र आपल्याजवळ असलेला व्यासंग, आपले वाचन, चिंतन आणि एखादी गोष्ट पेश करण्याची कला यांच्या साह्याने कोठेही नोकरी करता कामा नये. हा व्यवसाय म्हणून केला पाहिजे तर स्वत:चा रोजगार स्वत: निर्माण केल्याचे समाधान मिळते आणि समाजात मानही मिळतो.

Leave a Comment