मुंबई: मुंबईच्या रस्त्यावर आपल्याला बेस्टची बस दिसतेच पण आता बेस्टची डक बस समुद्रातही धावणार आहे. मुंबईत बेस्टने ‘डक बस’ सुरू करण्याची तयारी चालवली असून ही बस रस्त्यावरसोबत पाण्यावरही सुस्साट धावू शकते. पर्यटकांना आकर्षित करण्यासोबत डक बस सुरू झाल्याने मुंबईकरांना सुद्धा याचा फायदा होईल.
मुंबईसाठी खुशखबर! आता समुद्रावर चालणार बस
आधीपासूनच अशा प्रकारची डक बस सेवा परदेशामध्ये सुरू आहे. त्याच धर्तीवर मुंबईत डक बस सुरू करण्याची योजना आहे. बस पाणी आणि रस्ता दोन्हीवर चालते. प्रयोग म्हणून सुरूवातीला गेट-वे ऑफ इंडिया ते कुलाबा ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे. डक बसने गेट वे ते कुलाबा जायला कमी वेळ लागेल. पण त्यासाठी मुंबईकरांना १०० ते १५० रुपये मोजावे लागतील.
१० किलोमीटर प्रति तास या गतीने डक बस समुद्रात चालेल. तर रस्त्यावर याची गती ५० किलोमीटर प्रति तास असेल.
२००९पासून मुंबईत डक बस सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी दिलेल्या आश्वासनानंतर आता ही सेवा सुरू होणार आहे. एकूणच आता मुंबईत डक बस सुरू होण्याचे हे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे.