मानेचे त्रास कमी करण्यासाठी

neck
साधारणत: वयाची पस्तीशी किंवा चाळीशी उलटली की, घराच्या बाहेर भरपूर फिरणार्‍या लोकांना मानेचे त्रास सुरू होतात आणि कधी तरी गळ्याभोवती पट्टा पडतो. स्पॉन्डिलायटिस्ने जखडून टाकले जाते. प्रत्येक मानदुखी ही स्पॉन्डिलायटिस्मुळेच असते असे नाही. परंतु अन्यही काही कारणांनी मानदुखी सुरू होऊ शकते. भरपूर काम करणे, संगणकापुढे बसताना आपली उंची आणि संगणकाचा स्क्रीन यांच्यात ताळमेळ नसणे किंवा मान उंच करून स्क्रिनवरचा मजकूर सतत वाचणे यामुळेही मानदुखी सुरू होते आणि डॉक्टरकडे जाण्याची वेळ येते.

जगातल्या दोन तृतीयांश लोकसंख्येला कधी ना कधी तरी मानदुखीचा त्रास झालेलाच असतो असे आढळून आलेले आहे. कारण मानदुखीची कारणे फार वेगवेगळी आहेत. काही लोकांना पाठीच्या मणक्यामध्ये दोष निर्माण झाल्यामुळे मानदुखी सुरू होऊ शकते. प्रवासात भरपूर धक्के बसल्यामुळे सुद्धा मानेचा त्रास होऊ शकतो. त्याचबरोबर आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे घसा दुखू लागला म्हणजे मानही दुखू लागते. विशेषत: घशाला जर संसर्ग झाला असेल तर तो संसर्ग मानेला त्रासदायक ठरू शकतो.

या मानदुखीवर काही इलाज घरच्या घरी करता येतात. यातले काही इलाज इतके सोपे आहेत की, त्यांचा औषधापेक्षाही चांगला उपयोग होतो. मेंथॉल आणि कापूर यांचा वापर जास्त उपयुक्त ठरतो. या दोन्हींचे समप्रमाणात मिश्रण करून किंवा दोन्ही उपलब्ध होत नसतील तर त्यापैकी एक बोटावर घेऊन दुखणार्‍या मानेच्या ठिकाणी चोळल्यास त्या भागातला रक्तप्रवाह सुरळीत होऊन मानदुखी कमी होते.

लव्हेंडर – लव्हेंडरचा उपयोग फार जुन्या काळापासून औषधी म्हणून केलेला आहे. आता लव्हेंडर ऑईल उपलब्ध झालेले आहे. हे तेल दुखर्‍या जागेवर चोळल्यास मानदुखी कमी होते. आल्याचा उपयोगही असा होऊ शकतो. मात्र आले चोळण्यासाठी न वापरता त्याचा चहा प्यावा किंवा आल्याचा काढा घ्यावा. काही लोक आल्याचा रस काढून तो दुखर्‍या भागावर चोळतात. तोही उपाय चालतो. अर्निका या फुलापासून एक औषध बनवले जाते. ते बाजारात मिळते. तेही मानदुखीवर वापरता येते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment