दुसऱ्या कसोटीत फलंदाजांची कसोटी

combo
लंडन – भारत व इंग्लंड यांच्यात आजपासून लॉर्ड्सवर दुसरी कसोटी सुरू होत आहे. नॉटिंगहॅममधील पहिल्या सामन्यात खेळपट्टी फलंदाजीस अनुकूल असल्यामुळे दोन्ही संघांकडून धावा जमविल्या गेल्या, विशेषतः तळाच्या फलंदाजांकडून मात्र लॉर्ड्सची खेळपट्टी `जिवंत’ बनविण्यात आल्यामुळे ती वेगवान गोलंदाजांस उपयुक्त ठरण्याची शक्यता असल्यामुळे फलंदाजांची खऱया अर्थाने `कसोटी’ लागणार आहे. सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

या सामन्याच्या दोन दिवस आधी लॉर्ड्सच्या मध्यवर्ती खेळपट्टीवर बऱयापैकी हिरवळ ठेवण्यात आली होती. पण गुरुवारी नाणेफेकीआधी ती बरीचशी कमी झाल्याचे दिसू शकेल. हिरवळीचा अंश कमी झाला तरी त्याचा `जिवंतपणा’ कमी होणार नाही. त्यामुळे फलंदाजांची विशेषतः भारतीय फलंदाजांच्या तंत्राची कसोटी लागू शकते. हिरवळीचा अंश असलेली खेळपट्टी ही दोन्ही संघांतील गोलंदाजांसाठी आनंदाची बातमी आहे. नॉटिंगहॅममध्ये दोन्हीकडच्या गोलंदाजांना बळीसाठी कठोर संघर्ष करावा लागला होता. त्या श्रमाचे बक्षीस त्यांना या सामन्यात मिळू शकेल.

बुधवारी भारतीय संघाने या सामन्यासाठी कसून सराव केला. त्यावरून या कसोटीतही पाच गोलंदाजांची थिअरी कायम ठेवली जाण्याचे संकेत मिळाले आहेत. नॉटिंगहॅमधील खेळपट्टी संथ असल्यामुळे सामना अनिर्णीत राहिला आणि त्यावर बरीच टीकाही झाली. लॉर्ड्सची खेळपट्टी पूर्णतः वेगळी असेल अशी अपेक्षा असली तरी दोन्ही संघ पाच गोलंदाज थिअरीशी या सामन्यातही चिकटून राहण्याची शक्यता आहे. त्यात चार वेगवान असतील.

भारताने अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला पहिल्या कसोटीत पदार्पणाची संधी दिली. पण पाटा खेळपट्टीमुळे त्याच्या मेडियम स्विंग गोलंदाजीचे पूर्ण प्रदर्शन होऊ शकले नाही. धोनीने त्याचा पहिल्या डावात अधूनमधून वापर केला. फलंदाजीच्या संधीचे मात्र त्याने दुसऱया डावात शानदार अर्धशतक झळकवून सोने केले. मधल्या फळीतील काही फलंदाज झटपट बाद झाल्याने संघ अडचणीत आला होता. पण त्याने संघाला अडचणीतून बाहेर काढत सामना अनिर्णीत ठेवण्यात यश मिळविले. फलंदाजांत कोहलीने अजून चमक दाखविलेली नाही. त्याने धवन, पुजारा, रहाणे यांच्यासमवेत फलंदाजीचा कसून सराव केला. त्यानंतर ट्रेव्हर पेन्नी यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्ररक्षणाचाही सर्वांनी सराव केला.

Leave a Comment