राज्यातील निवडणुका सण व परीक्षा बघून निश्चित करणार

sampath
मुंबई- मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या तारखा सण, परीक्षा आणि पाऊस यांची स्थिती पाहूनच निश्चित केल्या जातील असे सांगितले. निवडणूक आयोगाचा राज्यातील विधानसभा निवडणुकांची प्रक्रीया डिसेंबर अखेरपर्यंत पुर्ण करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधानसभा निवडणूक तयारीची पहाणी आणि आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नेतृत्त्वाखाली एक पथक राज्यात दोन दिवसांच्या दौ-यावर आले होते.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरू असलेल्या तयारीचा आढावा मुख्य निवडणूक आयुक्तांनी घेतला. यावेळी त्यांनी राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, पोलिस अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली. महाराष्ट्राबरोबरच हरियाणा आणि झारखंडच्याही निवडणूका होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. त्यानुसार त्या कालावधीतील सण, परिक्षा आणि पाऊस यांचा अंदाज घेवून तारखा जाहीर होतील.

राज्यात सद्यस्थितीत आठ कोटी सहा लाख मतदार असल्याचे त्यांनी सांगितले. तर १९ लाख ३१ हजार नव मतदारांनी नोंदणीसाठी अर्ज केले आहेत. जवळपास ९२. १५ टक्के मतदारांना मतदार ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई, ठाणे आणि पुण्यात मतदार याद्यांतून मोठय़ा प्रमाणात नावे गायब झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्याची दखल आयोगान घेतली आहे. त्यानुसार ज्यांची नावे वगळली गेली आहेत अशांच्या घरी स्पिड पोस्टने मतदार नोंदणीसाठी नमुना अर्ज ६ पाठवला जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत मतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे.

Leave a Comment