भुशी डॅम झाला ‘ओव्हर फ्लो’

bushi-dam
पुणे – पावसाने पुणे जिल्ह्यातील लोणावळा-खंडाळा परिसरात चांगलाच धोर धरला आहे. पर्यटकांच्या पसंतीचे केंद्र असलेले भुशी धरण आज दुपारी ‘ओव्हर फ्लो’ होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले असून याठिकाणी आखाडपार्ट्यांची जय्यत तयारी सुरु झाली आहे.

भुशी डॅम गतवर्षी १६ जूनलाच भरले होते. मात्र यंदा तब्बल एक महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाल्याचे पहायला मिळाले. सकाळी नऊ वाजता धरण काठोकाठ भरले. सकाळी नऊ पर्यंत मागील चोवीस तासात ९४ मिलीमीटर पावसाची नोंद लोणावळ्यात झाली. एकूण पावसाचे प्रमाण कमी असून चालू हंगामात आतापर्यंत ५६५ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला.

पावसाचा जोर चांगला असल्याने आजच धरण ‘ओव्हर फ्लो’ होणार हे समजताच परिसरातील नागरीक तसेच पर्यटकांनीही याठिकाणी धाव घेतली. दुपारी दीडच्या सुमारास धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले. शेकडो नागरिकांनी हा क्षण डोळ्यात साठवून ठेवला. पाय-या व सांडव्यांवरुन पाणी वहायला लागताच तेथे धाव घेत चिंब भिजण्याचा आनंद याठिकाणच्या उपस्थितांनी घेतला.

पावसाची संततधार सुरु असल्याने सहारा पूल धबधबा, दुधीवरे धबधबा, लायन्स पॉईंट धबधबा कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. आखाड पार्टी आणि लोणावळा-खंडाळ्याची सैर हा आनंद पर्यटकांसाठी काही वेगळाच असतो. भुशी धरण तसेच परिसरातील धबधबे कोसळू लागल्याच्या वृत्ताने आखाड पार्ट्यांसाठीची तयारी सुरु झाली आहे. पर्यटकांचा ओघ वाढण्याच्या शक्यतेने पोलिस यंत्रणाही कामाला लागली आहे.

2 thoughts on “भुशी डॅम झाला ‘ओव्हर फ्लो’”

Leave a Comment