प्रक्रिया उद्योग : शोषण मुक्तीसाठीचे शस्त्र

cotton
आपण प्रक्रिया उद्योगाची माहिती घेत आहोत. तेव्हा ती घेताना प्रक्रिया उद्योगाचे अर्थव्यवस्थेतले महत्व नीट लक्षात घेतले पाहिजे. आपण सारे शेतकरी आपल्या गरिबीच्या विरोधात लढा देत आहोत. शोषणाच्या विरोधात संघर्ष करीत आहोत. या संघर्षातले प्रक्रिया उद्योग हे ब्रह्मास्त्र आहे, ते नीट वापरले की आपल्या या संघर्षात आपला विजय ठरलेला आहे. त्यासाठी आपल्या मनाची मात्र तयारी व्हायला हवी. प्रक्रिया उद्योग हे शस्त्र कसं काम करीत असतं हे कळलं की मनाची तयारी होणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शेतकर्‍यांच्या स्थितीचे योग्य विश्‍लेषण केले होते आणि या देशात इंडिया विरुद्ध भारत असा आर्थिक लढा सुरू आहे असे म्हटले होते. खरे म्हणजे इंडिया म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच इंडिया. मग या दोन देशात संघर्ष कसा होईल ? प्रथमदर्शनी आपल्याला तसे वाटेल पण वस्तुस्थिती अशी आहे की, असा संघर्ष सुरू आहे. भारत म्हणजे खेड्यात वसलेला इंडिया आहे आणि इंडिया हा शहरात वसलेला भारत देश आहे. ङ्गार गोंधळात न पडता असे म्हणता येईल की, खेडी विरुद्ध शहरे असा हा संघर्ष आहे. खरे तर आपल्याला हा संघर्ष उघडपणे दिसत नाही, पण तो आहे. हा लढा आर्थिक आहे. खेड्यात कच्चा माल तयार होतो आणि त्याच मालापासून शहरात पक्का माल तयार होतो.

शहरातला हा पक्का माल परत खेड्यातच आणून विकला जातो. हे तर घडतच आहे आणि ते आपण पहातच आहोत. मग यात संघर्ष कसला ? त्याला संघर्ष म्हणावे तरी कशाला ? प्रश्‍न साहजिक आहे. पण उत्तर ङ्गार भेदक आहे. खेड्यातला कच्चा माल शहरात जातो हे खेड्यातल्या गरिबीचे कारण आहे आणि शहरात त्याचा पक्का माल तयार होतो हे शहरांच्या श्रीमंतीचे कारण आहे. असा हा गरिबीचा संघर्ष आहे. असाच संघर्ष ३०० वर्षांपूर्वी भारतात सुरू झाला होता. तो संघर्ष ब्रिटन विरुद्ध भारत असा होता. इंग्रजांनी आपल्यावर लादलेली गुलामी मुख्यत्वे आर्थिक होती. त्या काळात इंग्लंड-यूरोपात औद्योगिक क्रांती होऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढली होती. त्यांच्याकडे असलेल्या यंत्रांची भूक वाढली होती. त्या यंत्रांना खाऊ घालायला त्यांच्याकडे कच्चा माल नव्हता. तो भारतात होता. भारतात कापूस भरपूर होता. त्यापासून हातमागावर सावकाशीने कपडा तयार होत होता. पण इंग्रजांनी हा कापूस मोठ्या प्रमाणावर खरेदी केला आणि तो त्यांच्या देशातल्या कापड गिरण्यांत घातला. त्यापासून भरपूर कपडा तयार झाला.

भारतातला कापूस १ आण्याला किलो अशा दराने खरेदी केला. त्यापासून १ रुपयाचा कपडा तयार झाला. त्यांच्या देशातल्या यंत्रांची कापसाची भूक भागली. प्रचंड कापड तयार झाले पण आता हे कापड भारतातल्या शेतकर्‍यांना २ रुपयांना विकले. आमचा कापूस तिकडे गेला. तसा तो गेला नसता तर आमच्याच देशात वापरला गेला असता आणि त्यावर आमच्याच देशात कपडा तयार होऊन आमच्याच देशातल्या हातमाग कामगारांना, विणकरांना रोजगार मिळाला असता, पण तो बुडाला. म्हणजे इंग्लंडमध्ये केवळ आपला कापूसच गेला नाही तर त्यासोबत आपला रोजगारही गेला. आपल्या कापसावर मँचेस्टरमध्ये प्रक्रिया होऊन १ रुपयाचा कपडा तयार झाला. मँचेस्टरमधल्या कापड गिरण्यांंनी कापसाला थोडा भाव दिला. भाव मिळतोय असे दिसताच भारतातले शेतकरी भरमसाठ कापूस पिकवायला लागले. त्यांनी भरपूर कापूस पिकवेपर्यंत त्यांना चांगला भाव मिळेल असे वातावरण तयार करायचे आणि कापूस पिकून तयार झाला की, कापसाचे भाव पाडायचे, असा खेळ इंग्रजांनी सुरू केला. मग कापूस उत्पादक आत्महत्या करायला लागले.

आत्महत्यांची परंपरा तेव्हापासूनची आहे. आताही उसाच्या बाबतीत असेच केले जाते. ऊस अगदी मोठा होईपर्यंत, ‘यंदा ऊस उत्पादकांना न्याय मिळणार, साखरेचे भाव वाढणार, शेतकरी सुखी होणार’ असे बोलले जाते. एकदा ऊस तयार झाल्यानंतर मग भाव किती द्यायचा याची चर्चा सुरू करून भाव पाडले जातात. वर्षानुवर्षे असे चाललेले आहे. महात्मा गांधींनी इंग्रजांची कूट आर्थिक नीती ओळखली. इंग्रजांशी सुरू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत या लढ्यात कच्चा माल महत्वाचा आहे आणि प्रक्रिया हे शस्त्र आहे हे त्यांनी ओळखले. त्यांनी लोकांना सांगितले, इंग्रजांना कापूस देऊ नका, त्या कापसावर स्वत:च आपल्या घरी प्रक्रिया करा. त्याचे चरख्यावर सूत काता आणि त्या सुताचा कपडा हातमागावर गावातच तयार करा. इंग्रजांचा प्राण भारतातल्या कच्च्या मालात गुंतला होता. तो कच्चा माल म्हणजे कापूस, त्यांना न विकता लोक स्वत:च त्याचे जमेल तसे जाडे भरडे खादीचे कापड तयार करून वापरायला लागले. त्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले. या लढ्याकडे जरा नीट बघा. जो कच्चा माल विकत बसतो तो गरीब राहतो आणि पक्का माल तयार करणारा श्रीमंत होतो. भारताला स्वातंत्र्य मिळाले तरीही कच्च्या मालाची लूट संपली नाही. १९४७ पर्यंत गोर्‍या इंग्रजांनी लूट केली होती.

१९४७ नंतर मोठ्या शहरात राहणार्‍या काळ्या इंग्रजांनी सुरू केली. ते राहतात तो देश इंडिया आहे, झकपक आहे, पॉश आहे. त्यांची मुलं इंग्रजीतून शिकत आहेत. इंग्रजीतून शिकलं म्हणजे शहाणं होणं हा समज त्यांनी व्यवस्थित तयार केला आहे. ते वातानुकूलित घरात राहतात, टेबलावर जेवतात. त्यांच्यात आणि इंग्रजात काही ङ्गरक नाही. शेतकर्‍यांचा कच्चा माल स्वस्तात लाटण्याची तीच युक्ती त्यांनी इंग्रजांकडून शिकून घेतलेली आहे. ङ्गरक एवढाच आहे की, त्या इंग्रजांचा रंग गोरा होता. या इंडिया वासीयांचा रंग काळा आहे. कातडीच्या रंगात ङ्गरक आहे, अंत:करणाच्या रंगात काहीच ङ्गरक नाही. तो दोघांचाही काळा आहे. शेतकर्‍यांचा कापूस स्वस्तात घेऊन शेतकर्‍यांनाच महागात कापड विकण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे. शेतकर्‍यांचा ऊस दीड रुपये किलो भावात खरेदी करून त्याची साखर त्यालाच ४० रुपये किलो दरानं विकणं सुरूच आहे. कच्चा माल तयार करणारा शेतकरी वरचेवर गरीब होत आहे. तो अगदीच मरायला लागला की, कर्जमाङ्गीचं एखादं इंजेक्शन देऊन त्याला जगवतात. एवढा एक डोस मिळाला की, गलितगात्र झालेला शेतकरी ताजा तवाना होऊन उठतो आणि इंडियातल्या लोकांना स्वस्तात कच्चा माल पुरवण्यासाठी पुन्हा कष्ट करायला लागतो. त्याची साखर कडू होऊ नये म्हणून राबायला लागतो. कांदा चिरताना त्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून घाम गाळायला लागतो. त्यांच्या कपड्यांची किंमत ङ्गार वाढू नये म्हणून जास्तीत जास्त कापूस पिकवतो. इंडियातल्या लोकांची चंगळ होते पण त्यांच्यासाठी कापूस पिकवणारा शेतकरी मात्र ङ्गाटके कपडे घालतो.

Leave a Comment