प्रक्रिया उद्योगाने समृद्धीची दारे खुली

food
इंडियातल्या कारखानदारांना कोणकोणता कच्चा माल विकणं बंद करता येईल याची चाचपणी करू या. निव्वळ कच्चा माल स्वस्तात विकून आणि तेवढे पैसे घेऊन बुडाला हात पुसण्याची प्रवृत्ती कमी करू या. आंबा खेड्यात पिकतो, त्याचे लोणचे पुण्यात किंवा मुंबईत तयार होते आणि तेच लोणचे शेतकरी ८० रुपये किलो भावाने खरेदी करून खातो. त्याचा आंबा जातो, आंब्यासोबत रोजगार जातो आणि लोणच्याचे ८० रुपयेही जातात. मग तो कंगाल होणार नाही तर काय होईल ? आणि इंडियाचे लोक श्रीमंत होणार नाहीत तर काय होईल ? खेड्यात तयार होणारा लोणच्याचा आंबा १० ते१५ रुपये किलो भावाने खरेदी केला जातो. त्याचे पुण्या-मुंबईत लोणचे घातले जाते आणि तेच लोणचे खेड्यातले लोक ८० रुपये किलो दराने विकत घेतात. यात खेड्यांचे काय गेले ? आंबा गेला, रोजगार गेला आणि लोणच्यासाठी मोजलेले पैसेही गेले. प्रक्रिया उद्योगाची अवस्था, आपल्या बाबतीत तरी ‘तुझे असून तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ अशी झाली आहे. आपण वर्षानुवर्षे शेती मालावर किती तरी प्रकारच्या प्रक्रिया घरीच करीत आलो आहोत पण आपण ते सारे विसरलो आहोत. गवारीच्या शेंगा वाळवण्याची प्रक्रिया (!) आपण दिली आहे. अशी उन्हात भाज्या वाळवण्याची प्रक्रिया तर वर्षानुवर्षे होत आली आहे.

महाराष्ट्राच्या काही भागात वांग्याच्या ङ्गोडी उन्हात वाळवून त्या उतरंडीत ठेवून देण्याची पद्धत आहे. त्या ङ्गोडी योग्य वेळी भाजीसाठी वापरल्या जातात. यालाच आजच्या काळात ‘डीहैड्रेशन’ असा इंग्रजी शब्द वापरला जातो. खरे तर कोणत्याही शेती मालाला चांगल्या कडक उन्हात वाळवले की त्यातला पाण्याचा अंश कमी होतो. त्यालाच डीहैड्रेशन म्हणतात. पाण्याचा अंश पूर्ण कमी झाला की, तो शेतीमाल चांगला टिकतो. आपण शेतातले गहू, ज्वारी इत्यादी धान्ये सुद्धा वाळवून मगच कणगीत भरत असतो. प्रक्रिया उद्योगात वाळवणे आणि कसले तरी प्रिझर्व्हेटिव्ह टाकून टिकवून ठेवणे या क्रियांचा समावेश होत असतो. आपण ते करीत आलो आहोत. आता त्याला व्यापारी स्वरूप द्यायचे आहे, एवढेच. शेतकरी अनेक प्रक्रिया करत आले आहेत. पण त्यांचा व्यापार करावा असे त्यांच्या मनातही आलेले नाही आणि आले तरी व्यापार करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला नाही. मराठवाड्यातल्या शेतकर्‍यांनी थोडे आठवावे म्हणजे त्यांना कळेल. रब्बी ज्वारीत वाळकांचे मिश्र पीक घेतले जाते. या दिवसात मोठमोठी पिवळीधमक वाळके हाती येतात. काही वाळके आहेत तशीच ठेवून दिली जातात आणि यथावकाश वापरली जातात. वाळके चिरून त्याच्या छोट्या छोट्या ङ्गोडी वाळवून वापरल्य जात असतात.

आणखी एक खाद्य वस्तू छान वाळवून विकता येते, ती म्हणजे कैरीच्या कुसर्‍या. उन्हाळ्याच्या दिवसात मध्येच अवकाळी वारा सुटला की, झाडाच्या कैर्‍या मोठ्या प्रमाणात पडतात. मग बाजारात कैर्‍यांचे ढीग लागतात. त्या दिवशी कैर्‍यांना कोणी वाली नसतो. रुपयाला चार कैर्‍या दिल्या तरी कोणी घेत नाही. अशा कैर्‍या चिरून त्यांचे तुकडे वाळवून ठेवून नंतर वापरता येतात. कालवणात, आमटीत आंबटपणा येण्यासाठी त्या चिंचेच्या ऐवजी सर्रास वापरल्या जातात. उलट प्रत्येकाच्या घरात उतरंडीचा एक डेरा अशा कुसर्‍यांनीच भरलेला असतो. आपण या कुसर्‍यांची विक्री करण्याचा विचार कधी केलेला नाही. पण काही डोकेबाज लोकांनी (लोकांनी म्हणजे व्यापार्‍यांनी, शेतकर्‍यांनी नव्हे) या कुसर्‍यांचा व्यापारी उपयोग केला आहे. अशा वाळलेल्या कुसर्‍या चांगल्या वाळल्या की त्यांचे पीठ केले. हे पीठ किंवा पावडर आमचूर म्हणून विकला जातो. अशी पावडर प्लॅस्टिकच्या पाकिटात घालून १०० ग्रॅमला १० रुपये या दराने विकली जाते. पडलेल्या कैर्‍या मातीमोल विकण्यापेक्षा त्यांची पावडर केली तर किती जास्त पैसे मिळतील याचा अंदाजही येत नाही.

शेतकर्‍यांनी एखाद्या सुपर मार्केटमध्ये जाऊन आमचूर हा काय प्रकार आहे आणि त्याची किंमत किती आहे यांचा शोध अवश्य घ्यावा. आपल्या पडलेल्या कैर्‍या आणि आमचूर यांच्या किंमती ऐकून ते कपाळावर हात घेतल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्याची ४ आण्यांची कैरी इथे १० रुपयांची झालेली असते. याला अर्थशास्त्र म्हणतात. व्हॅल्यू ऍडीशन किंवा मूल्यवृद्धी. कोणत्याही वस्तूवर काही प्रक्रिया केली की त्याचे मूल्य म्हणजे किंमत वाढते. शेती मालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढवले जाते. त्याचा भरपूर मोबदला व्यापार्‍याला मिळतो. पण पिकांवर प्रक्रिया करून (म्हणजे शेती करून) त्यापासून शेतीमाल तयार करणार्‍या शेतकर्‍यांना किती मोबदला मिळतोय याची चिंता कोणी करीत नाही. त्यामुळे शेतकरी गरीब आणि ग्रामीण भारत भकास आहे. शेतकर्‍यांनी आता जास्त मोबदला देणार्‍या, पुढच्या प्रक्रियांमध्ये सहभागी व्हायला शिकले पाहिजे. तशा कोणकोणत्या प्रक्रिया करता येतील याचा शोध घेतला पाहिजे. तरच समृद्धीचे दरवाजे त्यांच्यासाठी खुले व्हायला लागतील.

Leave a Comment